Pune Man Assaulting Traffic Cop: पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका नशेखोर तरुणाने भररस्त्यात वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला. शनिवारी संध्याकाली ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नशेत असून मगरपट्टा येथे रस्त्यावर हुल्लडबाजी करत होता. या ठिकाणी कर्तव्य बजवात असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला हटकले. मात्र, त्यामुळे राग अनावर झाल्याने आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. यानंतर स्थानिकांनी हस्तक्षेप करत नशेखोर तरुणाला थांबवले. या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आणि हडपसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलिसाला मारहाण करणारा हा तरुण प्रचंड नशेत होता. या नशेखोर तरुण मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. तसेच या रस्त्यावरून जात असलेल्या अनेकांना तो दगड सुद्धा फेकून मारहत होता. या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणाला हाटकले. त्यामुळे आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली, असे सांगण्यात आले.
या घटनेनंतर आता पोलिसांच्या कार्यप्रणाली वरती शंका उपस्थित केली जात आहे. ४ जानेवारी रोजी आळंदी वाहतूक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर यांनाही एका तरुणाने मारहाण केली होती. वाहतूक पोलिसाने दंडात्मक कारवाई केली म्हणून एका ३३ वर्षीय तरुणाने वाहतूक पोलीस अंकुश वाडेकर यांच्यावर हल्ला केला होता. मात्र, काल घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी काय प्रतिक्रिया देतात आणि कोणती कारवाई करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या