Pune Woman Police Constable Dies By Suicide: पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने आळंदीतील इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. संबंधित महिला कॉन्स्टेबलने पाण्यात उडी घेतल्याचे पाहून तिथे उपस्थित असलेल्या तरुणाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. महिला कॉन्स्टेबलने असे टोकाचे पाऊल का उचलले? याचाही शोध घेतला जात आहे. महिला पोलिसाने असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार (वय, २०) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. अनुष्का या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. पण गेली दोन दिवस त्या कर्त्याव्यावर नव्हत्या. दिघी- वडमुखवाडी येथे राहणाऱ्या अनुष्का यांनी रविवारी चार वाजताच्या सुमारास घर सोडले. त्यानंतर त्यांनी थेट इंद्रायणी नदीचा पूल गाठला. दरम्यान, त्यांनी साडेपाचच्या सुमारास चाकणकडे जाणाऱ्या पुलावरील गरुड खांबापासून इंद्रायणी नदीत उडी मारली.
अनुष्का यांना पाण्यात उडी घेतल्याचे पाहून तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने त्यांना वाचवण्यासाठी वाहत्या प्रवाहात उडी घेतली. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनुष्का वाहून गेल्या. अनुष्का यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून वैयक्तिक कारणामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याची भीती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या एका मित्राला फोन करून आत्महत्येची माहिती दिली होती. याप्रकरणी आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पालघर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहात १८ वर्षीय आदिवासी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जव्हार तालुक्यातील साकूर येथील आश्रमशाळेतील वसतिगृहात दहावीत शिकणारी शुभांगी रामदास पागी हिचा मृतदेह २० ऑगस्ट रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या माहितीच्या आधारे जव्हार पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वसतिगृहाला भेट दिली. अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडली नसली तरी हे टोकाचे पाऊल कशामुळे उचलले, याचा तपास सुरू असून, पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असली तरी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.