Pune Rain : खडकवासला, पवना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain : खडकवासला, पवना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune Rain : खडकवासला, पवना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Updated Jul 28, 2024 10:36 PM IST

Pune Weather Update : पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराजवळील खडकवासला धरण ८० टक्के,पानशेत धरण ९४ टक्के आणि टेमघर धरण ७८ टक्के क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पावसाळा कालावधीसाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

खडकवासला, पवना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार
खडकवासला, पवना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग होणार

पुण्यातील खडकवासला (Khadakwasla Dam) व पवना धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग केला जाणारअसल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर परिसरातील सर्वचधरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसपडत असून येत्या ४८ तासात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. प्रशानसनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराजवळील खडकवासला धरण ८० टक्के, पानशेत धरण ९४ टक्के आणि टेमघर धरण ७८ टक्के क्षमतेने भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराजवळील पवना धरण ८४ टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी रात्री (२८ जुलै) आणि सोमवारच्या पहाटे अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्यामुळे येत्या ४८ तासांत मुठा व पवना नदीपात्रात पर्जन्यमानानुसार मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. सध्या खडकवासला व पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असून पावसाच्या प्रमाणानुसार व साठ्यानुसार धरणातून नदीपात्रात विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल.

त्यामुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पवना नदीपात्रातील ब्लू लाईन एरियात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य व जनावरे असल्यास तत्काळ हलवण्यात यावीत. ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुठा व पवना नदीचे निषिद्ध क्षेत्र त्वरित रिक्त करून योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,पुणे सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण,पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण परिसरात २ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भात २९ जुलैपासून २ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर