Pune Weather update: पुणे जिल्ह्यात आज मावळ, शिरूर, पुणे शहर मतदार संघात मतदान होत आहे. या मतदानावर अवकळी पावसाचे सावट आहे. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. सकाळ पासून पुण्यात अंशत: ढगाळ हवामान आहे. तर दुपार नंतर पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त तर दुपारी ३ च्या आधी मतदान उरकण्याचे आवाहक करण्यात आले होते. पुण्यात कमाल तापमान हे ३७ डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान हे २३ डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पुणे आणि परिसरात १३, १५ आणि १६ तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना विजांचा कडकडाटासह हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १४ तारखेला विजांचा कडकडाट मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात, मावळ, शिरूर, बारामती, पुणे शहर, दौंड तालुक्यात रविवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बारामती येथे वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले. बारामती तालुक्यातील बाबुर्डी परिसरातही सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.सोसाट्याच्या वादळीवाऱ्याने गावातील चार शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.घरातील वस्तूंचे व अन्नधान्य भिजल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळीवारे मोठया प्रमाणावर असल्याने गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय वादळीवाऱ्याने वीजचे खांब मोडल्याने गावातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
पुण्यात आज सकाळ पासून अंशत: ढगाळ हवामान आहे. उन कमी असल्याने मोठ्या प्रमाणात मतदार हे मतदानासाठी भेर पडले होते. सकाळी ९ वाजता पुण्यात ६.६१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर ११ वाजता १७. ६१ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
पुण्यात दुपार नंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांपासून पुण्यात संध्याकाळच्या सुमारास वादळी वारे वीजांचा कडकडाटासह पाऊस होत आहे. आज देखील पावसाची शक्यता आहे. वातावरणात उन कमी असले तरी उकाडा जाणवत आहे.