Pune Rain News : दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुण्यात जोरदार पुनरागमन करत शहराला झोडपून काढलं आहे. काही मिनिटांच्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागात व रस्त्यांवर पाणी साचलं आहे. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
पुण्यातील हडपसर येथे मुसळधार पाऊस झाला. एक तासाहून अधिक वेळ झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हडपसर भागात श्रीराम शिल्पाचे अनावरण होणार होते. त्याआधीच पावसाने धुमाकूळ घातला आहे.
हडपसरमध्ये हडपसर भागात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. एका तासाच्या पावसामध्येच गुडघाभर पाणी साचलं आहे. अनेक गाड्या पाण्यामध्ये अडकल्या आहेत. या धुवाधार पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातही अडथळा निर्माण झाला आहे.
याआधी २५ जुलैला झालेल्या पावसाने पुण्यात हाहाकार माजवला होता. सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेकांचे संसारही उद्धवस्त झाले होते. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्यामुळेही पुण्याच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं.
शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून पुणेकरांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. १० दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पाऊस सुरू झाला आहे. सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने छत्रीशिवाय बाहेर पडलेल्या पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक भागात दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
पुण्यात सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. १ ते दीड तासांच्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले. दरम्यान आज सायंकाळी हडपसरच्या हांडेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीरामच्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी याठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने कार्यक्रमासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या पाण्यात तरंगताना दिसत होत्या. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने साचलेल्या पाण्याचा हळूहळू निचरा होत आहे.