Pune News : मतदानाच्या दिवशी मतदान न करता पुणेकर बाहेर जाण्याला प्राधान्य देतात. याचा परिमाण मतदानाच्या टक्केवारीवर होतो. त्यामुळे मतदारांमधील मतदान करण्याची उदासीनता घालवण्यासाठी आता विविध संघटना पुढे आल्या आहेत. पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी पुणेकरांना अनेक आकर्षक सवलती देखील या संघटनांनी जाहीर केल्या आहेत. यात मोफत पेट्रोल पासून ते अनेक बाबी मतदान केयास मतदारांना दिल्या जाणार आहेत.
पुणे नागरिक मंच, क्रेडाई, आर्ट ऑफ लिव्हिंग, पुणे हॉटेलर्स असोससिएशन, पुणे रेस्टॉरेंटर्स अँड हॉटेलर्स असोसिएशन, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट्स महासंघ या संस्थांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे.
या बाबत माहिती देतांना पुणे नागरिक मंचाचे विशाल नलकरे म्हणाले की, पुण्यात गेल्या काही वर्षापासून मतदान कमी होत आहे. पुणे हे राज्यातील महत्वाचे शहर असून नागरिकांत मतदानाविषयी उदासीनता वाढत असल्याने ती बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. या अभियानात ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, हास्य क्लब आणि गृहनिर्माण संस्था देखील जोडल्या असून ते देखील या कामात आम्हाला मदत करणार आहेत.
पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे सुहास पटवर्धन म्हणाले, गृह सहकारी संस्थांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मतदान वाढण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करत असून सोसायटी पातळ्यांवर सहकार मित्र नेमण्यात आले आहेत.
पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले, आम्ही २० नोव्हेंबरला मतदानाच्या तारखेला इंजिन ऑइल खरेदीवर ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देऊ. तर रेस्टॉरेंटर्स अँड हॉटेलर्स असोसिएशनचे गणेश शेट्टी म्हणाले, लोकशाहीच्या या सगळ्यात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य बजावलेल्या व्यक्तींना हॉटेलमध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
मतदान केंद्रांवर सर्व संस्था- संघटनांतर्फे सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार असून सोसायटी पातळीवर वॉर रूम देखील तयार करण्यात येणार आहे. या सोबतच अनेक स्पर्ध्याचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.