Pune Viral Video: पुण्यातील नऱ्हे भागात एक व्यक्ती आपल्या दुचाकीसह पुणे महानगरपालिकेने खणलेल्या खड्यात पडला. दुचाकीस्वार खड्ड्यात पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या घटनेला महानगरपालिका जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुदैवाने, या घटनेत दुचाकीस्वारला मोठी दुखापत झाली नाही. परंतु, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
पुणे येथील नऱ्हे भागात ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांवर खोल आणि मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. या खोद कामातून रस्ता काढताना एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो दुचाकीसह खड्ड्यात पडला. हा खड्डा खूप खोल असल्याने दुचाकीस्वारला बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दुचाकीस्वार खड्ड्याच्या बाजूने रस्ता काढत असताना दुचाकीसह खड्ड्यात पडतो. खड्ड्यात पडण्यापूर्वी दुचाकीस्वार स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो, पण तो अपयशी ठरतो. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक त्याच्या मदतीसाठी धावतात. खड्डा खोल असल्याने नागरिकांना दुचाकीस्वारला बाहेर काढण्यात अचडण येते. काही वेळानंतर दुचाकीस्वारला बाहेर काढले जाते.
सुदैवाने, या घटनेत दुचाकीस्वारला मोठी दुखापत झाली नाही. पण या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी पुणे महानगरपालिकेवर निशाणा साधला. पुणे महानगरपालिकेने अधिक काळजी घेण्याची गरज आहे, निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, असे नागरिकांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ड्रेनेज लाईनसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, ज्याचे काम आता सुरू झाले आहे. परंतु, वाहतूक कोंडी आणि रस्ता बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ज्या ठिकाणी खोदकामाचे काम सुरू आहे, तिथून पायी चालणे देखील नागरिकांसाठी कठीण झाले आहे.
संबंधित बातम्या