Shiroor Drown News: शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. शिरूर तालुक्यातील पाबळ येथे बुधवारी (२२ मे २०२४) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने पाबळ गावांवर शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन संतोष नवले (वय, १३) आणि आयुष संतोष नवले (वय, १०) असे अशी शेततळ्यात पडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. आर्यन आणि आयुष हे दौंड तालुक्यातील राहु येथील रहिवाशी असून सुट्टीनिमित्त पाबळ येथील मामा सचिन भाऊसाहेब जाधव यांच्याकडे आले. दरम्यान, बुधवारी दुपारच्या सुमारास दोघेही बापू जाधव यांच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्याजवळ गेले. यानंतर पोहता येत नसून दोघांनी पाण्यात उडी मारली आणि बुडाले.
जवळच शेळ्यांना चार असलेले त्यांचे आजोबा बाळासाहेब जाधव यांनी आर्यन आणि आयुष पाण्यात बुडताना पाहिल्यानंतर मदतीसाठी आवाज दिला. त्याठिकाणी असलेले कैलास जाधव यांनी तळ्यात उडी मारून दोघांना बाहेर काढले. दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत शिक्रापूर पोलिसांकडून तपास केला जात आहे.
नाशिकच्या इगतपुरीमधील मुंढेगावात मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. पाय घसरून विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी आईनेही पाण्यात उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला तिच्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन पाणी आणण्यासाठी विहिरीकडे गेली. त्यावेळी विहिरीच्या काठावर असलेली मुलगी पाय घसरून पाण्यात पडली. मुलीला वाचवण्यासाठी महिलेने विहिरीत उडी घेतली. आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांच्या मदतीला कोणीही येऊ शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. मायलेकींचे मृतदेह घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या