Pune Traffic news : पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक मोठा बदल करण्यात आला आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आला आहे. या भागातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले असून येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन वाहतूक करावी असे आवाहन वाहुटक पोलिस उपयुक्त अमोल झेंडे यांनी केली आहे.
पुण्यात नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मंदिरांच्या परिसरात ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक बदल करण्यात आला आहे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तर बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच गर्दी पाहून येथील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर दरम्यानचा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. तर श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर, नारायण पेठेतील श्री अष्टभुजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या सोबतच पुण्याच्या मध्यभागातील मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांसाठी नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळ येथे वाहने पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात देखील वाहतूकीत बदल करण्यात आले आहे. रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टँड दरम्यान रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. तर मंदिर परिसरात वाहने लावण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. या मंदिरात येणाऱ्या भविकांसाठी नेहरू रस्ता व परिसरात वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सेनापती बापट रस्त्यावर श्री चतुःशृंगी मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास येथील वाहतूक ही पत्रकारनगर चौकातून वळवण्यात येणार आहे. सेनापती बापट रस्त्याकडे येणारी वाहतूक शिवाजी हाउसिंग सोसायटी चौकातून सेनापती बापट रस्त्याच्या डाव्या बाजूने एकेरी करण्यात येणार आहे. तसेच गर्दी पाहून या रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकातून दीप बंगला चौकातून, ओम सुपर मार्केटमार्गे गणेशखिंड रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. चतु:शृंगी मंदिरात येणाऱ्या भावीकांयातही पॉलिटेक्निक मैदानावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.