Pune Traffic Update : पुण्यात आज बकरी ईद साजरी केली जाणार आहे. या निमित्त गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून येथे येणाऱ्यांची मोठी संख्या पाहता वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सकाळी सहानंतर येथील होणारी वाहतूक ही वळवण्यात आली आहे. तर काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) परिसरातील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तर गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्वप्रकारच्या वाहतुकीस बंद राहणार आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी गोळीबार मैदान चौकातून वळून सीडीओ चौक, उजवीकडे वळून गुलटेकडीमार्गे इच्छितस्थळी जावे लागणार आहे.
तर, सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. कोंढवा, लुल्लानगरमार्गे येणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, नेपीयर रस्ता, मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार, भैरोबा नाला चौकमार्गे पुढील इच्छितस्थळी जावे.
तर, शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकाकडून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक ही पर्याची मार्गाने वळविण्यात आली आहे. तर वाहनचालकांना सॅलसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे लागणार आहे. सोलापूर रस्त्याने गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक देखील वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा नेपीयर रस्तामार्गे, सीडीओ चौकातून इच्छितस्थळी जावे लागणार आहे.
या सोबतच पुणे सोलापूर मार्गावरील भैरोबानाला चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक देखील बदलण्यात आली आहे. येथील वाहतूक ही एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे वळविण्यात आली आहे. कोंढवा परिसरातून येणाऱ्या सर्व वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
संबंधित बातम्या