Pune Traffic Update : पुण्यात मेट्रोची कामे वेगात सुरू आहे. पुणे विद्यापीठ मार्गावरील आणि गणेशखिंड रस्त्यावरील टाटा मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात आले असून या मेट्रो स्थानकाच्या कामासाठी गर्डर लॉचिंगचे कामे केली जाणार आहे. त्यामुळे आज वेधशाळा चौक परिसरात शनिवारपासून (३ मे) पासून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या बदलांची दखल घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेकेचे काम वेगाने सुरू आहे. हे काम सिमला ऑफिस चौकापासून सुरू करण्यात आले आहे. शिवाजीनगर स्थानक, वीर चापेकर चौक, वेधशाळा चौकातील वाहतूक सुरळीत राहावी या हेतूने आज पासून या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकाच्या कामासाठी गर्डर लॉचिंगचे कामे केली जाणार असून हे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील वाहतूक वळवण्यात आली आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील वीर चापेकर चौक ते नरवीर तानाजी वाडी परिसरातील के. बी. जोशी मार्ग ते वेधशाळा चाैक (एसटी स्थानक मार्ग) मार्ग एकेरी करण्यात आला आहे. वीर चापेकर उड्डाणपुलावरुन वेधशाळेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी चापेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्याने चापेकर चौक, डावीकडे वळून नरवीर तानाजीवाडी, उजवीकडे वळून वेधशाळा चौकाकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरुन वीर चापेकर चौकातून वेधशाळा चौकाकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. येथून जाणाऱ्या वाहनचालकांनी वीर चापेकर चौकमार्गे, नरवीर तानाजीवाडी, उजवीकडे वळून सिमला ऑफिस चौकाकडे जावे. नरवीर तानाजीवाडी चौक ते चापेकर चैाक दरम्यानची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. वाहनचालकांना नरवीर तानाजीवाडी चौकातून डावीकडे वळून सिमला ऑफिस चौकातून उजवीकडे वळून चापेकर चौकाकडे जावे, लागणार आहे.
तर जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे (माॅडर्न कॅफे चौक) चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी वेधशाळा चौकमार्गे डावीकडे वळून वीर चापेकर चौक, उजवीकडे वळून नरवीर तानाजीवाडीमार्गे शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे जावे लागणार आहे.
शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडून एसटी स्थानक चौकातून नरवीर तानाजीवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वेधशाळा चौकातून गणेशखिंड रस्तामार्गे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एलआयसी कार्यालयाकडील बाजूने वळून वीर चापेकर उड्डाणपुलाकडे जावे. वीर चापेकर ते नरवीर तानाजीवाडी चौक ते वेधशाळा चौक परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.