Pune to Delhi flight cancelled : राजधानी दिल्लीत रविवारी धुक्याने जनजीवन विस्कळीत झाले. दाट धुक्याचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. रेल्वे आणि विमानसेवा ठप्प झाली असून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक तास प्रवासी विमानातच अडकून पडले होते. खराब हवामानामुळे विमाने उड्डाण करू न शकल्याने विमानतळावर विमानांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या तब्बल ६ फ्लाइट रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी याची दखल घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
पुणे ते दिल्ली विमानसेवेला मोठी पसंती आहे. रोज अनेक उड्डाणे दिल्ली साठी होत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने विमान सेवेवर आणि रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. दिल्ली येथे रविवारी मोठ्या प्रमाणात धुके पडले असल्याने पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या तब्बल ६ फ्लाइट रद्द करण्यात आल्या आहेत.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर अनेक विमाने लँडिंगनंतर धावपट्टीवरच उभे होते. दरम्यान, अनेक विमानांचे उड्डाण देखील रद्द झाल्याने विमानांना पार्किंगसाठी जागा नव्हती. त्यामुळे प्रवासी हे विमानाच अडकून पडले.
खराब हवामानामुळे दिल्ली, चेन्नई, वाराणसी लखनऊमधील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. दिल्लीत रविवारी किमान तापमान ३.५ अंश सेल्सियसची नोंद झाली.
रविवारीही दाट धुक्यामुळे २२ रेल्वे गाड्या उशिराने धावत होत्या. तर ७ विमानांचे मार्ग वळवण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी ६ फ्लाइट जयपूरच्या दिशेने तर एक फ्लाइट मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली आहे. ही सर्व उड्डाणे पहाटे ४.३० ते ७.३० दरम्यान वळवण्यात आली.
रविवारी दिल्लीत किमान तापमान ३.५ अंश सेल्सिअस होते, त्यानंतर रविवार हा या हंगामातील सर्वात थंड दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीबरोबरच दिल्लीकरांना दाट धुक्याच्या दुहेरी हल्ल्याचाही सामना करावा लागत असून त्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता शून्य झाली आहे.
पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार असून त्याचा परिणाम वाहतुकीवरही दिसून येईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. अशा परिस्थितीत दिल्ली विमानतळाने सर्व प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
दाट धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या अनेक गाड्या ६ तास उशिराने धावल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, दिल्ली आणि विविध राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे २२ गाड्यांना उशीर झाला.