Pune-Amravati train : पुण्यातून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते अमरावती दरम्यान नवीन गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. पुणे-अमरावती एक्स्प्रेस असे या गाडीचे नाव असून ही गाडी १० मार्चपासून दर शुक्रवारी आणि सोमवारी पुण्याहून रात्री १०.४५ वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता अमरावतीला पोहोचेल.
अमरावती – पुणे एक्स्प्रेस ही गाडी अमरावतीहून ९ मार्चपासून दर शनिवारी आणि सोमवारी रात्री ७.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.२५ वाजता पुण्याला पोहोचेल. पुणे ते अमरावती या मार्गावरील प्रवाशांना या गाडीमुळे फायदा होणार आहे.
या गाडीला उरुळी, केडगाव, दौंड जंक्शन, जिंती रोड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा हे थांबे आहेत. या गाडीला एकूण १७ आयसीएफ डबे आहेत. त्यात एक फर्स्ट एसी, एक एसी २ टियर, दोन एसी-३ टियर, ५ स्लीपर क्लास, ८जनरल सेकंड क्लाससह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असेल. या गाडीसाठी आरक्षण ९ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या पूर्वीही विदर्भात जाण्यासाठी रेल्वेने नव्या गाड्या सुरू केल्या आहेत. विदर्भात जाण्यासाठी पुणे नागपूर एक्सप्रेस, पुणे बिलासपुर एक्सप्रेस, पुणे नागपूर गरीब रथ, हावरा एक्सप्रेस, या प्रमुख गाड्या आहेत. दरम्यान, या नव्या गाडीमुळे इतर गाड्यांवरील तान कमी होणार आहे.
मुंबईत मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी (१० मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार ते ठाणे दरम्यान तर हार्बर मार्गावर डाऊन व अप मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.