मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : स्वातंत्र्यदिनी पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शहरात घरफोड्या करून लंपास केला ६ लाखांचा ऐवज

Pune Crime : स्वातंत्र्यदिनी पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शहरात घरफोड्या करून लंपास केला ६ लाखांचा ऐवज

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 15, 2022 07:43 PM IST

पुण्यात स्वातंत्र्य दिवासनिमित्त लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक जण हे बाहेर गावी गेले. हीच संधी साधत चोरट्यांनी शहरात विविध भागात घरफोडी करत तब्बल ६ लाखांचा ऐवज लंपास केला.

Maharashtra Crime News
Maharashtra Crime News (HT_PRINT)

पुणे : शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक हे पर्यटनासाठी बाहेर गावी गेले. आपली घरे बंद करून सुट्ट्यांचा आनंद साजरा करत असताना चोरट्यांनी मात्र, इकडे त्यांच्या घरांवर हात साफ केला. पुण्यात विविध भागत घरफोड्या करून चोरट्यांनी तब्बल ६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

वारजे आणि हडपसर भागात या घटना घडल्या. याबाबत चिराग पवळे (वय ३९, रा. वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवळे वारजे गावठाणातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी पवळे यांच्या सदनिकेचे कुलुप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ५८ हजारांचे दागिने लांबिवले. सदनिकेत चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करत आहेत.

हडपसरमधील भेकराईनगर परिसरात असलेल्या त्रिमूर्ती विहार सोसायटीतील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ४७ हजारांचे दागिने लांबविले. या प्रकरणी विशाल मोहिते (वय ३९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहिते यांच्या सदनिकेचे कुलुप चोरट्यांनी तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांवर अंकुश कसा लावावा हे पोलीसांपुढे आव्हान आहे. चोरटे बंद घरे हेरून त्या ठिकाणी चोरी करत आहेत. यामुळे पोलिसांनी रात्री तसेच दिवसा गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग