Pune Accident News: पुण्यातील दौंड तालुक्यात एसटी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ३० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. पुणे-सोलापूर मार्गावर यवतजवळ हा अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा अशरक्ष: चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. परंतु, पुण्यातील यवतजवळील सहजपूर गावाजवळ बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस झाडाला धडकली. हा अपघात इतका भीषण होती की, आसपासच्या लोकांना धडकेचा मोठा आवाज आला. मात्र, हा आवाज नेमका कशाचा होता? याची पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकांना एसटी बस झाडाला धडकल्याचे दिसले. अपघानंतर स्थानिकांनी वेळ न घालवता बचावकार्याला सुरुवात केली आणि जखमींना बसमधून सुरक्षित बाहेर काढले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघात एकूण ३० जण जखमी झाले असून त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुण्यात कात्रज येथे राज्य परिवहनच्या बसखाली येऊन एका २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (१५ जून २०२४) घडली. श्वेता चंद्रकांत लिमकर (वय, २५) असे मृत महिलेचे नाव आहे. लिमकर या आपल्या दुचाकीने पुण्याच्या दिशेने जात असताना एसटी बसच्या मागच्या चाकाखाली आल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची मााहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन लिमकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून सामान्य रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या