Pune Solapur Highway Accident : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. कारचं टायर फुटल्यानं हा भीषण अपघात झाला. इंदापूर तालुक्यातील डाळज येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर २ येथे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. ब्रिझा गाडीचा टायर फुटल्यामुळे गाडी तीन ते चार पलटी मारून एका खांबावर आदळली. या अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.
रफिक कुरेशी ( वय, ३४), इरफान पटेल (वय २४), मेहबूब कुरेशी (वय २४), फिरोज कुरेशी (वय २८) आणि फिरोज कुरेशी (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात सय्यद इस्माईल सय्यद आमीर हा तरुण जखमी झाला आहे.
गाडीमध्ये सहा पुरुष होते त्यापैकी ५ जण जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. २४ ते २८ वर्षे वयोगटातील हे सर्व तरुण तेलंगणा राज्यातील नारायणखेड, तालुका मेंढक येथील रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच डाळज महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेली (टी एस ०७ जी एल २५७४) ही ब्रिझा कार डाळज हद्दीत आल्यानंतर हा अपघात झाला. कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने गाडी साधारणपणे ५० मीटरपर्यंत जमिनीला घासत गेली व रस्त्यावर चार ते पाच पलट्या मारत ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबावर आदळली. त्यानंतर जवळच्या नाल्यात जाऊन गाडी कोसळली.
अपघाताची माहिती समजताच डाळज महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातातील जखमींना व ठार झालेल्यांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात अपघाताचीही घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेने पायी जात असलेल्या एका व्यक्तीला पाठीमागून आलेल्याएका भरधाव कारने उडवले. यात व्यक्तीचा जागीचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. मात्र, या संपूर्ण अपघाताची घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.