Pune Bike Accident: पुण्यातील शिवाजी रोडवर डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना शिवाजी रोडवरील रामेश्वर चौकात मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या घडली. याप्रकरणी डंपर चालकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम डोके (वय, २१) अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम हा मगरपट्टा येथील रहिवासी आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी तो दुचाकीवरून दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेला. दर्शन घेतल्यानंतर तो शिवाजी रोडने स्वारगेटला निघाला. मात्र, रामेश्वर चौकाजवळ त्याची दुचाकी डंपरखाली आली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी डंपरचालक कमलदेव कैलाश महतो (वय,२८) याला अटक केली आहे. तसेच नो एन्ट्रीतून दुचाकी नेल्यामुळे स्कूटरचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जंक्शनजवळ सोमवारी एका ४२ वर्षीय मतिमंद महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. सुप्रिया चंद्रकांत सुतार असे मृत महिलेचे नाव आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.