Sharad mohol murder case : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. नागरिकांमध्ये दहशत माजवण्यासाठी मुद्दामुन सीसीटीव्हीसमोर येऊन मोहोळचा खून करण्यात आला. या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे आरोपींच्या बँक खात्याची माहिती घ्यायची आहे. या मागचा मास्टर माइंड नेमका कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली तर ‘पोलिसांकडून आरोपींची पोलिस कोठडी मागितली जाते. त्यानंतर वेगळ्याच गोष्टी ‘रेकॉर्ड’वर येतात. पोलिस ‘प्लँचेट’ही करतात,’ असा आरोप बचाव पक्षाचे वकील अॅड. केतन कदम यांनी युक्तिवादादरम्यान केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, मुळशी), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा) यांना अटक केली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
तपास अधिकाऱ्यांनी मोहोळ खून प्रकरणात १२० ब (कट रचणे) हे अतिरिक्त कलम लावण्याची मागणी केली आहे. या बाबतचा जर देखील त्यांनी केला आहे. तपास अधिकारी सुनील तांबे यांनी कोर्टात माहिती देताना सांगितले की, या आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी मुळशी तालुक्यात दोन-तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केला. या ठिकाणांना शोध घ्यायचा आहे. तर एका व्यक्तीने आरोपीला सीमकार्ड दिले. यचा वापर करून आरोपींनी कॉल केले. याची चौकशी करायची आहे, असे देखील तांबे म्हणाले.
सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव व तक्रारदारांचे वकील अॅड. गोपाल भोसले यांनी यांनी तपासातील प्रगती पाहता आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढीची मागणी केली. बचाव पक्षाचे वकील अॅड. केतन कदम यांनी त्याला विरोध दर्शविला. ‘आरोपींची पोलिस कोठडी वाढविण्यासाठी तपास अधिकारी गृहितकावर आधारित जुनीच कारणे देत असून, बँक स्टेटमेंट, सीसीटीव्ही चित्रीकरण आदी तांत्रिक पुरावे पडताळण्यासाठी आरोपींच्या प्रत्यक्ष कोठडीची गरज नाही. असे ते म्हणाले. या सोबतच त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला. ‘पोलिसांकडून आरोपींची पोलिस कोठडी मागितली जाते. त्यानंतर विविध बाबी पुढे येतात. पोलिस ‘प्लँचेट’ करतात,’ असा आरोप वकील अॅड. केतन कदम यांनी युक्तिवादादरम्यान केला. ही बाब बचाव पक्षाच्या वकिलांच्या आरोपामुळे नोंदीवर घ्यावी,’ अशी विनंती तपास अधिकारी सुनील तांबे यांनी केली. सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनीही बचाव पक्षाचे आरोप खोडून काढले.