Pune school holiday : पुण्यात गुरुवारी पावसाने थैमान घातले. शहराच्या बहुतांश भागातील रस्ते हे जलमय झाले होते. तर सिंहगड रस्त्यावरील नदी पत्राशेजारी असलेल्या काही सोसायट्या आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले होते. यमुळे काल जिल्ह्यातील शाळा या बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, आज देखील पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आज देखील पुण्यातील आणि जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मात्र शाळेत जाऊन काम करावे लागणार आहे.
राज्यात गुरुवारी बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. मुंबई, कोकणात आणि विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. पुणे शहर व जिल्ह्यात पावसाने थैमान माजवले होते. बुधवारी रात्री पासून ते गुरुवारी दिवसभर पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पुण्यात बहुतांश भागात पाणी साचले होते. पावसामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिक अडकले होते. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफ व अग्निशमनच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य राबवून बाहेर काढले. तर लष्कराच्या तुकड्या देखील बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात अळ्या होत्या. पुण्यात झालेल्या या पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहिर केली होती. त्यानुसार आज शुक्रवारी देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तब्बल ३२ वर्षानंतर पुण्यात अतिवृष्टी
पुण्यात ३२ वर्षांनंतर अतिवृष्टी झाली आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. हवामान खत्यानं पुण्यासाठी शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात आज उद्या शाळा, महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २६ जुलै रोजी बंद ठेवाव्यात असे जिल्हाधिकारी यांनी म्हटलं आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सकाळी ७ वाजता १३ हजार ९८१ क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. नागरिकांनी दक्षता बाळगावी. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
- कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे
संबंधित बातम्या