मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

May 19, 2024 11:50 PM IST

RTO Whatsapp Helpline Number : भाडे नाकारणाऱ्या, जादा भाडे आकारणाऱ्या तसेच प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांना आता लगाम बसणार आहे. पुणे आरटीओ १ जूनपासून हेल्पलाईन नंबर लाँच करणार असून याच्या माध्यमातून अशा रिक्षा चालकांवर तत्काळ कारवाई होणार आहे.

गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाची व्हॉट्सअ‍ॅपवर  करता येणार तक्रार
गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाची व्हॉट्सअ‍ॅपवर करता येणार तक्रार

शहरांमध्ये प्रवास करताना रिक्षाचालकाच्या मनमानीचा त्रास सहन करावा लागतो. अनेक त्यांच्याकडून भाडे नाकारले जाते किंवा  जादा भाडे मागितले जाते. अशा प्रकरणात अथवा रिक्षा चालकाने गैरवर्तन केल्यास संबंधित प्रवाशांच्या तक्रारींचे जलद निवारण होणार आहे. रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) यासाठी उपक्रम राबवला आहे. अशा प्रकरणात प्रवासी १ जूनपासून व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर थेट तक्रार नोंदवू शकतात तसेच त्यावर आरटीओकडूनही तत्काळ कारवाई केली जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शहरात रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याचे सर्रास दिसून येते. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अनेक रिक्षाचालक जवळच्या अंतराचे भाडे घेत नाहीत किंवा अशा प्रवासासाठी मीटरप्रमाणे भाडे न घेता मनमानी पद्धतीने भाडे मागतात. अनेक रिक्षा चालक मीटरने जाण्याऐवजी अव्वाच्या सव्वा रक्कम सांगून प्रवाशांची लूट करतात. मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मात्र, अशा प्रकरणात तक्रार कोठे करायची याची माहिती नसल्याने प्रवाशांची कुंचबना होत होती. 

हे वाढते प्रकार लक्षात घेऊन आरटीओने रिक्षाचालकांच्या विरोधातील तक्रारी प्रवाशांना सहजपणे करता याव्यात यासाठी व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांची तक्रार या क्रमाकांवर केल्यानंतर आरटीओचे अधिकारी या तक्रारींची शहानिशा करतील. या व्हॉट्सॲप हेल्पलाइनमुळे नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवरील कारवाईची प्रक्रिया जलद होणार आहे.

२०२३ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत आरटीओकडून २ हजार ४९५ रिक्षांची तपासणी करण्यात आली होती. त्यात १ हजार ६१३ रिक्षाचालक दोषी आढळले होते. त्यात भाडे नाकारल्याप्रकरणी ९० जणांवर कारवाई करण्यात आली होती. याचबरोबर मीटरमध्ये छेडछाड करणे तसेच जादा भाडे आकारणाऱ्या ६० जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर ५७ चालकांवर प्रवाशांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी कारवाई झाली.

कशी होणार दोषी रिक्षाचालकांवर कारवाई -

प्रवाशांना एक हेल्पलाईन नंबर दिला जाईल. प्रवाशी नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकाचे छायाचित्र,  किंवा व्हिडिओ व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर पाठवू शकतात. त्यानंतर आरटीओतील अधिकारी संबंधित रिक्षाचालक आणि प्रवासी या दोघांची बाजू जाणून घेतील. प्राप्त पुराव्यांच्या आधारे रिक्षाचालकाने नियमभंग केल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग