Pune Metro : पुण्यात पावसामुळे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होणारे मेट्रोच्या भूमिगत मार्गिकेचे उद्घाटन रद्द झाले होते. आज रविवारी या मार्गिकेच्या उद्घाटणाला मुहूर्त मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या भुयारी मार्गाचे उद्घाटन आज होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने नरेंद्र मोदी या मार्गिकेचे उद्घाटन दुपारी १२.३० वाजता करणार आहेत. या निमित्त आयोजित कार्यक्रमात पुण्यातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पुणे मेट्रोच्या ३३ किमीच्या टप्पा एकचे काम पूर्ण होऊन जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या अंतिम भुयारी मार्गाचे पंतप्रधान आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. गणेश क्रीडा मंदिर येथे हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात स्वारगेट ते कात्रज या नवीन दक्षिण विस्तारित मार्गीकेचे भूमिपूजन देखील मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या मार्गिकेची लांबी ५.४६ किमी असुन या मार्गिकेचा एकूण खर्च २९५५ कोटी आहे. या मार्गिकेवर मार्केट यार्ड, पद्मावती, बालाजी नगर आणि कात्रज ही ४ स्थानके आहेत. या मार्गामुळे पद्मावती, बालाजी नगर, धनकवडी, कात्रज हे भाग मेट्रोद्वारे जोडले जाणार आहेत.
पुणे मेट्रोच्या टप्पा १ ज्यामध्ये पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनझ ते रामवाडी या दोन मार्गिका आहेत. यापैकी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या अंतिम भूमिगत मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या मार्गिकेमुळे पुण्यातील दाट लोकवस्ती असणारा कसबा पेठ, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हा भाग मेट्रो मार्गीकेने जोडला जाणार आहे. मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुपारी ४ वाजता या मार्गावर प्रवासी सेवा सुरू केली जाणार आहे. त्यानंतर थेट पीसीएमसी ते स्वारगेट हा प्रवास या मार्गावर करणे पुणेकरांना शक्य होणार आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी ३४ मिनिटे वेळ जाणार असून त्यासाठी ३५ रुपये भाडे असणार आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा पीसीएमसी या दिशेने प्रवास करू शकतात.
या मार्गीकेतील बुधवारपेठ-कसबापेठ हे स्थानक लाल महाल, शनिवार वाडा, कसबा गणपती, इलेक्ट्रिक मार्केट, यांच्या जवळ असून त्यामुळे येथे भेट देणाऱ्या लोकांना मोठ्याप्रमाणावर या मेट्रो मार्गाचा फायदा होणार आहे. तसेच मंडई स्थानक अत्यंत मध्यवर्ती भागात असून महात्मा फुले मंडई, तांबट आळी, तुळशीबाग, भांडी मार्केट, दगडूशेठ गणपती मंदिर अशा ठिकाणी प्रवाशांना जाणे सहज शक्य होणार आहे. या भागात प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने तेथे लोक जाण्याचे टाळत होते. परंतु आता मेट्रो पोहोचल्यामुळे या भागातील व्यापाराला चालना मिळणार आहे.
स्वारगेट मेट्रो स्थानक हे एसटी स्थानक आणि पीएमपीएमएल बस डेपो यांच्या जवळच बांधण्यात आले आहे. त्यामुळे येथे मल्टी मॉडेल इंटिग्रेशन हब तयार झाले आहे. एसटी तथा पीएमपीएल बसने आलेले प्रवासी शहराच्या दूरवरती भागांना जसे की पीसीएमसी, रामवाडी, वनाझ येथे सहज जाऊ शकणार आहेत.
शहरातील विविध भागातील लोकांना स्वारगेट येथे जाऊन एसटी बाबत घेणे विनासयास शक्य होणार आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक ते एसटी स्थानक हे लवकरच भूमिगत पादचारी मार्गाने जोडले जाणार आहे, त्यामुळे प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची गरज पडणार नाही.