two zika patients were found in pune : पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळली असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. एरंडवणा येथील एक डॉक्टर व त्याच्या मुलीला हा संसर्ग झाला असून या दोघांना ताप व अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे आहेत. आरोग्य विभागाने याची तातडीने दखल घेत त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची देखील तपासणी केली जात आहे. मात्र, सुदैवाने कुणीही बाधित आढळून आलेले नाही.
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. तर हा डास डेंग्यू देखील पसरवतो. साठलेल्या पाण्यात प्रामुख्याने त्यांचं प्रजनन होतं. झिका विषाणू बाधित रुग्णांमधे अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणं दिसतात.
पुण्यात या वर्षी पहिल्यांदाच हे झिका बाधित रुग्ण सापडले आहेत. एरंडवण्यातील ४६ वर्षीय डॉक्टर व त्याच्या १५ वर्षीय मुलीला या विषाणूचा संसर्ग झाला. आधी डॉक्टरला याची लक्षणे आढळली. त्यांच्या रक्ताचे नमुने हे १८ जूनला राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल हा २० जूनला मिळाला तर मुलीच्या रक्ताचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तिच्या अहवालात तिला देखील विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. सध्या दोघांवर उपचार सुरू आहे.
दरम्यान, महापालिकेने देखील प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू केल्या आहेत. आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या परिसरात औषध फवारणी सुरू केली असून डासोत्पत्ती ठिकाणे शोधून ती नष्ट करण्यास प्राधान्य दिले जात आहे. तर घरोघरी जाऊन सर्वेक्षण देखील केले जात आहे. तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांचावर औषधोपचार केले जात आहे.
दरम्यान, सध्या पावसाचे दिवस आहे. घरात पाणी साठणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. साठलेल्या पाण्यात डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, अंगांत पूर्ण कपडे घालावे, डास प्रतिरोधक औषधांचा वापर करा, गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख कल्पना बळीवंत यांनी केले आहे.
झिकाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर मनपाचे आरोग्य अधिकारी आणि संसर्गजन्य रोगांच्या तज्ज्ञांनी या परिसरात भेट दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकानेही सोमवारी एरंडवणे ला भेट दिली. या व्यक्तीचे आई-वडील, पत्नी आणि मुलगी असे पाच जण आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याचे आई-वडील आणि पत्नी यांना विषाणूची लक्षणे नाहीत.
महापालिकेच्या एका वरिष्ठ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, संपूर्ण एरंडवणे परिसरात पाळत ठेवण्याचे काम सुरू असून पुढील १४ दिवस हे काम सुरू राहणार आहे. परिसरातील काही सोसायट्यांमध्ये डासांची उत्पत्ती आढळून आली असून सहा गृहनिर्माण संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. घरोघरी जाऊन पाळत ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हे पथक दोन रुग्ण राहत असलेल्या गृहनिर्माण संस्था आणि आजूबाजूच्या परिसरात कीटकनाशकफवारणी आणि फॉगिंग करत आहे. मात्र, पाळत ठेवताना एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही.
ताप असलेल्या नागरिकांनी जवळच्या पीएमसी रुग्णालयात जाऊन झिका विषाणूसंसर्गाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी केले आहे. झिका, डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वेक्टर हाच डास एडिस इजिप्ती आहे. एडिस डासांची घरगुती पैदास होण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. कीटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराच्या आत, गच्चीवर आणि घराच्या आजूबाजूला साचलेले पाणी साफ करावे, असे डॉ. दिघे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या