Pune air pollution : पुणे तेथे उणे काय असे नेहमीच उपहासाने म्हटले जाते. वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणे शहर हे जगात सातव्या क्रमांकावर असल्याचे काही दिवसांपूर्वी एका अहवालात सिद्ध झाले होते. त्या पाठोपाठ आता पुणे प्रदूषणात देखील पुढे येणार आहे. पुढील काही दिवसांत शहरात प्रदूषणात मोठी वाढ होणार आहे. या संदर्भातील अहवाल पुण्यातील नामवंत संस्था आयआयटीएमने दिला आहे. या प्रदूषण वाढीचा गंभीर परिमाण पुणेकरांच्या आरोग्यावर होणार आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या ही ऐरणीवर आली आहे. रोज प्रत्येक रस्तावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला पुणेकर वैतागले आहेत. त्यात आत प्रदूषणाची भर पडणार असल्याने सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (IITM) पुण्यासाठी एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग अँड डिसीजन सपोर्ट सिस्टमद्वारे प्रदान केलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या माहितीनुसार पुण्यातील प्रदूषणात वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात या साठी १५ ठिकाणी प्रदूषण मापक बसवण्यात आले असून त्यातील १३ प्रदूषण मापकावरून घेतलेल्या माहितीनुसार पुण्यात पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रदूषण मापकाद्वारे घेण्यात आलेल्या माहिती आणि नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणात पुण्यातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे आढळले आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी वाढ होणार आहे. गेल्या दोन दिवसांत हवेच्या प्रदूषणाचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा १०० पेक्षा जास्त झाला आहे. वाढ झाली आहे. हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, भोसरी आणि थेरगाव येथे येत्या २४ तासांत वायू प्रदूषणात वाढ होण्याचा अंदाज संस्थेने वर्तवला असून तर पाषाण परिसरात सर्वात स्वच्छ हवा नोंदवली गेली. सोमवारी पुण्यातील हवेची गुणवत्ता १२१ एक्यूआयसह मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली.
पुणेकर गेल्या काही दिवसांपासूंन खराब दृश्यमानतेची तक्रार करत आहेत. विशेषत: सकाळच्या वेळी आणि बाहेर पडल्यावर प्रदूषित हवेमुळे डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यात त्रास होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
धायरी परिसरातील रहिवासी विष्णू सरोदे म्हणाले, “धायरित धुक्यासारखी परिस्थिती होती. विशेषत: पहाटेच्या वेळी धुक्यात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी परिस्थिती चांगली होती. पण गेल्या दोन-तीन दिवसांत धुक्याचे आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.
सध्याची परिस्थिती हवामानातील बदलांमुळे असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. वाऱ्याचा प्रवाह आणि शहरात येणारी आयद्रता यामुळे शहरात स्वच्छ आकाश जरी असले तरी हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने ११ तारखेला पुण्याच्या तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली. शिवाजीनगरमध्ये किमान तापमान ११.६ अंश सेल्सिअस होते. तर १२ फेब्रुवारी रोजी तापमान २ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ते १३.१ अंश सेल्सिअस झाले.
वरिष्ठ हवामान तज्ज्ञ शिल्पा आपटे म्हणाल्या, "पुणे शहरात निरभ्र आकाश असून, उत्तरेकडील थंड वारे शहरात येत असल्याने किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून, द्वीपकल्पीय भारतातून चक्रीवादळ आणि दक्षिण आग्नेय वारे हे आद्रता घेऊन येत आहेत. त्यामुळे पुण्यातील तापमानावर याचा परिमाण झाला आहे.