Pune Rape News: पुण्यातील (Pune) इंदापूर (Indapur) तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका ८० वर्षाच्या आरोपीला अटक केली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने इंदापूर तालुक्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यात २२ सप्टेंबर रोजी एका वृद्ध व्यक्तीने परिसरातील एका २६ वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र,या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे.
अल्पवयीन मुलीवर गेल्या चार वर्षांपासून बलात्कार केल्याप्रकरणी दंतचिकित्सकाला नालासोपाऱ्यातील आचोळे पोलिसांनी अटक केली आहे. चार वर्षांपूर्वी मुलीच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आरोपी डॉक्टरांनी स्वेच्छेने मुलीची जबाबदारी स्वत:वर घेतली होती. मात्र, आरोपीने तिच्या निरागसपणाचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. अशी माहिती आचोळे पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी डॉक्टरवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याच दिवसी त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
नालासोपाऱ्यात जीवे मारण्याची धमकी देत अपंग महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फरार असलेल्या आरोपीने महिलेच्या खात्यातून दीड लाख रुपये काढले. तसेच तामिळनाडूतील आपल्या गावी राहण्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) (एन), ३७६ (२) (आय) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फरार असून त्याचा शोध घेऊन पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, बलात्काराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.