Pune Rain update : हवामान विभागाने पुण्याला रेड अलर्ट दिला आहे. पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुण्यातील बहुतांश धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील खडकवासला धरण साखळीतील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरू झाले आहे. या सोबतच मुळशी आणि पवना धरणातून देखील पाणी सोडले जात आहे. यामुळे पुण्यात सखल भागात पाणी साचुन पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यात व जिल्ह्यात अग्निशामक दल, एनडीआरएफ, आणि लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणातून ३५ हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पवना, मुळशी या धरणांचा एकूण विसर्ग आणि मुक्त पाणलोट क्षेत्रातून येणारे पाण्यामुळे मुळा मुठा संगमाला सुमारे ९०,००० ते १००,००० क्युसेक दरम्यान प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट व पुन्हा पुराची भीती असल्याने पाटबंधारे विभागाने दक्षता म्हणून आधीच विसर्ग वाढवला असून पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
खडकवासला धरण साखळी परिसरात आज सकाळी सहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत ७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पानशेत वरसगाव येथे १४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर येरवडा येथे १६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मुळशी तालुक्यातील कुंभेरी येथे ५४ मीमी, तर ताम्हिणी येथे ३१ आणि व लवासा येथे १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सध्या खडकवासला धरण साखळीतील वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये आज सकाळी ११ वाजता ९ हजार ८८५ क्यूसेक तर विद्युत गृह द्वारे ६०० कयुसेक असा एकूण १० हजार ४८५ विसर्ग सोडण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे .
पानशेत धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करून ९९०० क्यूसेक सांडव्याद्वरे व ६०० क्यूसेक विद्युत गृह निर्मिती द्वारे असा एकूण १० हजार ५०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २८११४ क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी ११ वाजता ३५००२ क्यूसेक करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार यात बदल केला जाऊ शकतो, अशी माहिती खडकवासला पूर नियंत्रण कक्षाने दिलीय.
उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय ८६ टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये आज सायंकाळी ५ वाजता २० हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. भीमा नदी काठच्या नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत असे आवाहंन उजनी धरण पूरनियंत्रण कक्षाने केले आहे.