पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १२ वर्षीय शाळकरी मुलगा दफ्तरासकट मुठा नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलाचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सदाशिव पेठमधील पुलावरून एक मुलगा पाण्यात पडल्याची घटना घडली. मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झालेला नाही. रविवारी रात्रीपासून खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडला जात आहे. मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने पुण्यातील प्रसिद्ध भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान,शहरातील पुना हॉस्पिटलच्या पुलावरून (poona hospital bridge) एक मुलगा मुठा नदीच्या पाण्यात पडला. मुलगा पुलावर पूर पाहायला गेला होता.
नदीच्या पाण्यात पडलेल्या या मुलाचं वय अंदाजे १२वर्ष असल्याचे सांगितलं जात आहे. मुलाच्या शोधासाठी अग्निशमन दलाकडून२पथके रवाना करण्यात आली आहेत. नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली आहे. पुलावर असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पाण्यात वाहून गेलेल्या मुलाच्या अंगावर निळ्या रंगाचा शाळेचा गणवेश व पाठीला दप्तर होते. मुलगा पुलावर एका बाजुला बसला होता व अचानक दप्तरासकट पाण्यात पडला व प्रवाहासोबत वाहून गेला.
टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला या चार धरणांमध्ये २४.९५ टीएमसी पाणीसाठा झाला. पानशेत धरण पूर्ण भरले आहे. तर वरसगाव धरण देखील भरण्याच्या मार्गावर आहे. यमुळे पानशेत धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग वाढवून पहाटे ४.०० वाजता १५ हजार १३६ क्यूसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग सोमवारी सकाळी ९.०० वाजता वाढवून २२ हजार ८८० क्यूसेक करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. व नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास त्यांना तात्काळ हलवावे असे आवाहन मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.
रविवारी पानशेत धरण ९४ टक्के क्षमेतेने भरले होते. त्यामुळे धरणातून कधीही पाणी सोडण्यात येईल असा इशारा पाटबंधारे खात्याने दिला होता. त्यानुसार आज सकाळ पासून १५ हजार क्युसेकने धरणात पाणी सोडण्यात येत आहे.
संबंधित बातम्या