Pune Porsche Car Accident : पुणे कल्याणीनगर पोर्शे कार (Porsche Car) अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून आता त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येणार आहे. दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोन जणांचे बळी घेतलेल्या या आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. मात्र अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलीस ठरवतील, असा निकाल बाल न्याय मंडळाने दिला आहे. निकालावेळी कोर्ट परिसरात पुणे पोलिसांचामोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. त्याची रवानगी आता बाल सुधारगृहात करण्यात येणार आहे. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाने न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांच्यासमोर युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन रद्द केला.
यावेळी सरकारी पक्षाकडून अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलिसांकडून ७५ हजार रुपयांचे दारूचे बिल आणि दारू पित असलेले बारमधील सीसीटीव्ही फुटेज कोर्टात पुराव्यासाठी सादर करण्यात आलं. आरोपीने कोझी आणि ब्लॅक या दोन्ही पबचे एकूण ७५ हजारचे बिल ऑनलाईन पेमेंट भरतानाचे पुरावे पोलिसांनी कोर्टात दिलेत. अल्पवयीन तरुणाकडून वकील प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.
अल्पवयीन आरोपीने दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत जोडप्याचा जीव घेतला होता. त्याने २०० च्या स्पीडने गाडी चालवून दुचाकीला धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की, गाडीवरील तरुणी २० फूट हवेत उडून रस्त्यावर आपटली होती. तर तरुण उडून दुसऱ्या कारच्या टपावर आदळला होता. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या भीषण अपघातात अवघ्या१५तासांमध्येच संबंधित अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता.
त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. न्यायालयाने ३०० शब्दाचा निबंध लिहिण्याचा व पोलिसांना वाहूतक नियमन करण्यास मदत करण्याची शिक्षा न्यायालयाने दिली होती. यावर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर पुन्हा नवीन कलम लावली आणि त्याचा जामीन रद्द करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला.