Pune car accident case : पुणे कार अपघातातील 'त्या' अल्पवयीन आरोपीनं पबमध्ये एका रात्रीत ४८ हजार रुपये उडवले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune car accident case : पुणे कार अपघातातील 'त्या' अल्पवयीन आरोपीनं पबमध्ये एका रात्रीत ४८ हजार रुपये उडवले!

Pune car accident case : पुणे कार अपघातातील 'त्या' अल्पवयीन आरोपीनं पबमध्ये एका रात्रीत ४८ हजार रुपये उडवले!

May 24, 2024 01:31 PM IST

Pune Porsche car crash case : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीनं अपघाताच्या रात्री आपल्या मित्रांसोबत पबमध्ये तब्बल ४८ हजार रुपये उडवल्याचं समोर आलं आहे.

पुणे कार अपघात: 'त्या' अल्पवयीन आरोपीनं पबमध्ये एका रात्रीत ४८ हजार रुपये उडवले!
पुणे कार अपघात: 'त्या' अल्पवयीन आरोपीनं पबमध्ये एका रात्रीत ४८ हजार रुपये उडवले!

Pune Porsche car accident case : पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपी, त्याचा बिल्डर पिता आणि रेस्टॉरंटच्या मालकांना अटक होऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. मात्र या प्रकरणात रोजच्या रोज नवीन माहिती समोर येत आहे. अपघाताच्या रात्री त्या अल्पवयीन मुलानं पबमध्ये तब्बल ४८ हजार रुपये उडवल्याचं समोर आलं आहे.

पुणे पोलिसांनी गुरुवारी अल्पवयीन मुलाचे आजोबा आणि मित्राची या घटनेसंदर्भात चौकशी केली. पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी कारची फॉरेन्सिक तपासणीही केली. अल्पवयीन मुलाच्या घरापासून रेस्टॉरंटपर्यंत, क्लबपासून अपघातस्थळापर्यंतच्या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फूटेज मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलानं आपल्या दोन मित्रांसोबत अपघाताच्या काही तास आधी एका पबमध्ये ४८ हजार रुपये खर्च केले होते.

कोठडीची मुदत आज संपणार

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा बिल्डर पिता विशाल अगरवाल याच्या पोलीस कोठडीची मुदत आज (२५ मे) संपत आहे. कोसी रेस्टॉरंटचे मालक नमन प्रल्हाद भुतडा, मॅनेजर सचिन काटकर आणि ब्लॅक क्लब हॉटेलचे मॅनेजर संदीप सांगळे या तिघांना मंगळवारी पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पुणे अपघात - आतापर्यंतचा घटनाक्रम

> पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी घडलेल्या हिट अँड रन प्रकरण घडलं होतं. एका अल्पवयीन मुलानं आपल्या भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला उडवलं. त्यात दोन आयटी इंजिनीअर्सचा मृत्यू झाला होता. 'हिट अँड रन'च्या घटनेच्या आदल्या रात्री घडलेला घटनाक्रम जाणून घेण्यासाठी गुन्हे शाखेने आरोपीचे आजोबा, ड्रायव्हर आणि मित्राला समन्स बजावलं आहे.

> अल्पवयीन मुलानं कोसी बार आणि ब्लॅक बार या वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये मद्यप्राशन केलं होतं. त्यानंतर रविवारी मध्यरात्री त्यानं पुण्यातील अरुंद रस्त्यावरून दोन दुचाकीस्वारांचा बळी घेतला.

> या प्रकरणात अल्पवयीन मुलाला लगेचच जामीन मंजूर झाला. किशोर न्याय मंडळानं आरोपी मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची व १५ दिवस समाजसेवा करण्याची शिक्षा दिली. विशेष म्हणजे, या मुलाच्या आजोबानं शिवसेना नेते अजय भोसले यांच्या खुनासाठी छोटा राजनला सुपारी दिल्याचा आरोप २००९ मध्ये सीबीआयनं ठेवला होता.

> पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाला प्रौढ मानण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना अद्याप मिळालेले नाहीत. ज्युवेनाइल जस्टीस बोर्डाच्या (JJB) सुनावणीत अल्पवयीन मुलाची बाजू मांडणारे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, अल्पवयीन मुलावर प्रौढ आरोपी म्हणून कारवाई करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. कारण, त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांचा अहवाल आवश्यक आहे. त्यानंतर जेजेबी आपला निर्णय घेते.

> अल्पवयीन मुलीचा पिता विशाल अग्रवाल (५०) यांच्यासह हॉटेल ब्लॅक क्लबचे दोन कर्मचारी नितेश शेवानी व जयेश गावकर यांना २४ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायालयानं बुधवारी दिले.

> कोठडीत असताना आरोपी मुलाला पिझ्झा आणि बर्गर देण्यात आल्याचं वृत्त होतं. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे, असं एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

> पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात भादंवि आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये एफआयआर दाखल केला आहे. तसंच, मुलाला विनापरवाना वाहन चालविण्याची परवानगी दिल्याबद्दल आणि दारू पिऊन जीव धोक्यात घातल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर किशोर न्याय कायद्याच्या कलम ७५ आणि ७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

> अपघाताच्या आधी अल्पवयीन मुलानं ज्या दोन बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं, त्या बारचे मालक व कर्मचाऱ्यांवरही पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. एका अल्पवयीन व्यक्तीला दारू पाजल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

> अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया अशी अपघातात मरण पावलेल्या दोन तरुण आयटी कर्मचाऱ्यांची नावं आहेत. हे दोघेही मध्य प्रदेशातील होते.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर