Pune Porsche crash case : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांसह आजोबांनाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आपल्याला झालेली अटक ही बेकायदा असून आपल्याला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप करत अटकेपासून दिलासा मिळावा, यासाठी आरोपीच्या आजोबाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
येरवडा पोलिस स्टेशनने अपघात झाला त्याच दिवशी त्यांच्याविरोधात स्वतंत्र एफआयआर दाखल केल्याने त्यांना २५ मे २०२४ रोजी अटक करण्यात आली होती.
आयपीसी कलम ३४२, ३६५, ३६८ आणि ५०६ आणि ३४ अन्वये चुकीच्या पद्धतीने अपहरण, बेकायदेशीररित्या कैद करणे आणि आपल्या फॅमिली ड्रायव्हरला आरोप अंगावर घेण्यासाठी धमकावणे या आरोपांचा समावेश आहे.
आजोबांचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी याचिकेत या अटकेवर आक्षेप घेत म्हटले आहे की, 'आजोबांना येरवडा पोलिसांनी २५ मे रोजी अटक करून पोलिस कोठडीत घेतले होते आणि सध्या ते येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. ज्येष्ठ नागरिक असलेल्या माझ्या क्लायंटला आरोपांच्या आधारे चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की माझ्या क्लायंटला ताब्यात घेताना फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी), १९७३ मध्ये नमूद केलेल्या कायदेशीर तरतुदी आणि नियमांचे पालन केले गेले नाही.
कल्याणीनगर येथे १९ मे रोजी अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने चालविलेल्या पोर्शे कारने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता.
पुण्यातील कल्याणीनगर येथे विशाल अगरवाल या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आलीशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दोघांना चिरडले होते. हा पघात झाल्यावर त्याला अटक करून त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससुनमध्ये नेण्यात आले होते. मात्र, अर्थपूर्ण व्यवहार झाल्यावर हे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणी सध्या ससुनचे डॉक्टर व शिपायाला आणि अगरवाल दाम्पत्याला अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, मुलाचे बदलले रक्ताचे नमुने कुणाचे होते, या बाबत पोलिस तपासात महत्वाची माहिती पुढे आली आहे. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवालात बदललेले रक्ताचे नमुने हे आरोपी मुलाची आई शिवानी अगरवाल यांचे असल्याचे तपासात पुढे आले आहे.