Pune Porsche crash : पोर्शे कार अपघात नवा खुलासा! मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलल्याचं उघड-pune porsche crash blood samples of accuseds friends also switched court told ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche crash : पोर्शे कार अपघात नवा खुलासा! मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलल्याचं उघड

Pune Porsche crash : पोर्शे कार अपघात नवा खुलासा! मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलल्याचं उघड

Aug 10, 2024 09:59 AM IST

Pune Porsche crash : पुणे पोर्श दुर्घटनेतील आरोपींसोबत असलेल्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलण्यात आल्याची माहिती सरकारी पक्षाने न्यायालयात दिली.

पोर्शे कार अपघात नवा खुलासा! मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलल्याचं उघड
पोर्शे कार अपघात नवा खुलासा! मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलल्याचं उघड (HT_PRINT)

Pune Porsche crash : पुणे पोर्श अपघात प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. आरोपींनी फक्त त्यांच्या मुलाचेच नाही तर त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने देखील बदलले आहेत. ते दारूच्या नशेत नव्हते हे दाखवण्यासाठी सरकारी रुग्णालय ससूनमध्ये हा प्रकार करण्यात आला. या साठी अल्पवयीन मुलाच्या पालकांनी ससुनच्या डॉक्टरांना पैसे दिल्याचे देखील उघड झाले आहे. 

पुण्यातील कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणातील ६ आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना सत्र न्यायालयात आरोपीचे आई-वडील विशाल आणि शिवानी अग्रवाल, दलाल अश्पाक मकंदर आणि अमर गायकवाड तसेच ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांचा सहभाग असल्याचा तपास सुरू आहे.

अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निरीक्षण गृहातून सोडण्यात आले. मात्र, हिट अँड रनदरम्यान त्याने मद्यपान केले नव्हते, हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याप्रकरणी त्याचे आई-वडील आणि ससून रुग्णालयातील डॉक्टर यांना अटक करण्यात आली आहे.

मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात आलीशान पोर्शे कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण आणि तरुणीला धडक देत त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना १९ मे रोजी कल्याणी नगर येथे घडली होती. सध्या या प्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे.

जामीन याचिकेविरोधात युक्तिवाद करताना विशेष वकील शिशिर हिरे यांनी दावा केला की, डॉ. हलनोळ यांना फॉरेन्सिक मेडिसिनचे ज्ञान असूनही आणि त्यांच्या कृतीचे कायदेशीर परिणाम त्यांना माहिती असूनही त्यांनी अपघातानंतर कार चालवणारा १७ वर्षीय तरुण आणि त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलले. अल्पवयीन मुलाचे आई-वडील आणि डॉ. तावरे यांनी रक्ताच्या नमुन्यात फेरफार केला. या साठी पैशाचा व्यवहार देखील झाल्याची माहिती सरकारी वकिलांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना कोर्टात दिली.

शिवानी अग्रवाल यांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सांगण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी (निवासी) डॉक्टरचा जबाब न्यायालयात सादर करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने त्याच्या आईच्या रक्ताने बदलण्यात आले. तर त्याच्या दोन मित्रांच्या बाबतीत, देखील शिवानी अग्रवालच्या रक्ताचे नमुने देखील पर्याय म्हणून वापरण्याची योजना होती, असे आणखी एका निवासी डॉक्टरने सांगितले. मात्र, आई-मुलाचा रक्तगट समान नसल्याने हे होऊ शकले नाही. त्यामुळे आणखी दोन जणांचे नमुने तपासण्यात आले. व त्यांनी मद्य प्राशन केले नव्हते असे देखील दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना नमुने घेतांना अल्कोहोलमध्ये (स्पिरिट) बुडवलेल्या कापसाऐवजी सुका कापूस वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले.

सरकारी वकिलांनी आणखी एका निवासी डॉक्टरच्या जबाबाचा दाखला दिला, ज्याला डॉ. हलनोळ यांना या साठी अडीच लाख रुपयांची रोकड दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी कोणत्याही कनिष्ठ डॉक्टरांना तपासणी साठी जाऊ दिले नाही. व त्यांनी या प्रकरणी स्वत: पुढाकार घेत रक्ताचे नमुने बदलण्यासाठी प्रयत्न केले.

बी. जे. मेडिकल कॉलेजमधील वसतिगृहात २३ मे रोजी डॉ. हलनोळ आणि डॉ. तावरे यांना काही पैसे देखील मिळाले. हे पैसे वसतिगृहाच्या खोलीत कपाट नसल्याने त्यांनी हे पैसे मित्राकडे ठेवण्यासाठी दिले. हे पैसे कशासाठी मिळाले, असे विचारले असता डॉ. हलनोळ यांनी या बाबत नंतर सांगतो असे तावरे यांना संगितले, असे वकील हिरे यांनी कोर्टात सांगितले. घटनास्थळावरील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अपघातानंतर मोठ जमाव जमा झाला होता. त्यांनी अल्पवयीन ड्रायव्हरला कारमधून बाहेर काढले. मद्यधुंद असल्याने मुलगा नीट उभा राहू शकत नव्हता. यामुळे तो कार चालवतांना नशेत असल्याचे दिसून येते, असे सरकारी वकिलांनी सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी ही सोमवारी होणार आहे.

विभाग