Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी पुण्यातील अगरवाल या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव आलीशान पोर्श कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली होती. यात दोन अभियंत्यांना जीव गमवावा लागला होता. ही आलीशान कार आरोपीच्या आजोबाने त्याला वाढदिवसानिमित्त दिली असल्याचे तपसात उघड झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच आरोपीने व्हॉट्सॲप ग्रुपवर कारचा फोटो शेअर करून याची माहिती मित्रांना दिली होती. आरोपीचे आजोबा आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला ही महागडी भेट दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचा मित्र अमन वाधवा याने ही माहिती दिली आहे. आरोपी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही कार चालकाला धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अपघाताच्या वेळी कार तो चालवत असल्याचे मान्य करण्यासाठी चालक गंगारामवर याच्यावर आरोपीचे आजोबा सुरेन्द्र अगरवाल यांनी दबाव टाकल्याचे म्हटले आहे. ड्रायव्हर गंगाराम याला अगरवाल यांच्या बंगल्यावर दोन दिवस डांबून देखील ठेवण्यात आले होते. याशिवाय गंगारामच्या पत्नीवर पतीला गुन्ह्याची कबुली देण्यासाठी मन वळवण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, १९ मे रोजी अपघात झाला त्या दिवशी १७ वर्षीय आरोपी पूर्णपणे शुद्धीवर होता. त्याच्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली आणि दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही मध्य प्रदेशचे रहिवासी असून ते बेंगळुरू येथे कामाला होते. यानंतर अग्रवाल कुटुंबीयांनी कथा तयार करण्याचा प्रयत्न केला. अग्रवाल कुटुंबाची इच्छा होती की गंगारामने संपूर्ण दोष स्वतःवर घ्यावा आणि त्यांचा मुलगा वाचेल.
गंगाराम यांचा मोबाईलही गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय अगरवाल यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्येही छेडछाड केल्याचे तपसात पुढे आले आहे. आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर अमन वाधवाने दावा केला की, तो आरोपीला गेल्या आठ महिन्यांपासून ओळखत होता. न्यायालयात सुनावणीवेळी तो देखील हजर होता.