Pune porsche case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मोठी घडामोड! रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक-pune porsche crash 2 more arrested for manipulating blood samples ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune porsche case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मोठी घडामोड! रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

Pune porsche case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मोठी घडामोड! रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

Aug 20, 2024 11:59 AM IST

Pune porsche case : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Pune porsche case
Pune porsche case

Pune porsche case : कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट पुढे आली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी अल्पवयीन मुलाचे वडील व बिल्डर विशाल अगरवाल यांना रक्ताचे नमुने बदल करण्यासाठी मोठी मदत केल्याचे उघड झाले आहे. या दोघांच्या माध्यमातून अगरवाल याने ससूनमधील डॉ. अजय तावरेसही संपर्क साधून रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचं आढळलं आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य अविनाश सूद (वय ५२), आशिष सतीश मित्तल (वय ३६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या पूर्वी या प्रकरणी बिल्डर विशाल अगरवाल, मुलाची आई शिवानी अगरवाल, ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड या आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात असून आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात झाला. भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल याने ससूनमधील डाॅ. तावरेशी संपर्क साधला. त्यासाठी मकानदार, गायकवाड यांच्या माध्यमातून चार लाखांची रक्कम देण्यात आली होती. अगरवालचे परिचित आदित्य सूद, आशिष मित्तल यांची डाॅ. तावरेशी ओळख होती. त्यांच्या माध्यमातून अगरवालने डाॅ. तावरेशी संपर्क साधल्याचे तपासात उघड झाले. गुन्हे शाखेकडून सोमवारी रात्री उशीरा सूद आणि मित्तल यांना अटक करण्यात आली. दोघांना अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पुण्यात १९ मे रोजी कल्याणीनगर येथे बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत अलिशाल पोर्शे कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या अभियंता असलेल्या तरुण व तरुणीला जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर आरोपी मुलाला अपघात प्रकरणात केवळ निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती त्यामुळे ही प्रकरण चांगलेच पेटले होते. यानंतर आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. दरम्यान,आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणी वरील दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अनेक धक्कादायक माहिती आतापर्यंत पुढे आली आहे. आरोपी मुलासोबत कारमध्ये असलेल्या मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलल्याचं पुढं आलं आहे. हे नमुने बदलल्याप्रकरणी आता आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी (दि २०) न्यायालय सुनावणी होणार आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरोपींच्या जामीन अर्जावर सरकारी पक्ष व बचाव पक्षाने युक्तिवाद पूर्ण केला आरोपींच्या जामीन अर्जावर आज न्यायालय निर्णय देणार आहे.

विभाग