Police Commissioner Amitesh Kumar on Car accident : कार अपघात प्रकरणी पुणे पोलिस कुणाला मदत करत आहे असा सवाल करत पुण्याला लाभलेले आयुक्त म्हणजे कलंक अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उत्तर दिले आहे. आज पुणे पोलिस आयुक्तालयात प्रेस घेत आयुक्त म्हणाले, पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. माझ्या बाबतीत कोण काय बोलले मला माहिती नाही. मात्र, या प्रकरणी आम्ही कोर्टात दोन वेळा याचिका दाखल केली होती. मात्र, दोन्ही याचिका फेटाळण्यात आल्या आहे. आम्ही केलेली कारवाई ही तत्पर होती. असे देखील आयुक्त म्हणाले.
पुण्यातील कल्याणी नगर येथे बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन बेदरकारपणे कार चालवत दोघांना उडवले. यात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्पवयीन कारचालकाचे वडील बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह आज ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमितशे कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.
आमच्यावर कुणाचाही दबाव नाही: आयुक्त
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. कठोर कारवाई करणे हीच आमची भूमिका आहे. रविवारी आम्ही कोर्टात दोन अर्ज दाखल केले होते. यातील पहिला अर्ज हा आरोपीला प्रौढ ठरवण्याचा होता. तर दुसरा रिमांड होमचा होता. मात्र कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले. आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर आहे. त्याला ७ वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. मात्र, आरोपीचे वय हे १६ वर्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे बालन्याय कायद्यानुसार प्रौढ म्हणून वागणूक मिळाली पाहिजे असा युक्तिवाद आम्ही केला. त्यात त्याने मद्य पिऊन परवाना नसतांना गाडी चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने त्याला १४ दिवसासाठी रिमांड होममध्ये पाठवण्यात यावे हा अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे.
HSC Result 2024 Live : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!
आम्ही घेतलेल्या भूमिकेपेक्षा जर आणखी जास्त कठोर भूमिका कुणी घेण्यास तयार असेल तर आम्ही त्या व्यक्तीशी चर्चा करण्यास तयार आहोत. आम्ही पहिल्या दिवसापासून कायद्याच्या मार्गावर असून या दुर्दैवी घटनेत दोन निष्पाप जीवांचा बळी गेला त्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही अनाई कधी नव्हता असे अमितेश कुमार म्हणाले.