Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2024 06:09 PM IST

Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातातील मृत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांच्यावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनिशच्या भावाने येरवडा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार
पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार

पुण्यातील कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अश्विनी कोस्टा (Ashwini costa) आणि अनीश अवधिया (anish awadhiya) या तरुण जोडप्यावर तब्बल ५० तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांचेही मृतदेह सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. अश्विनी कोस्टा ही तरुणी मध्य प्रदेशातील जबलपूरची तर अनीश अवधिया उमरियाचा रहिवाशी होता. भावपूर्ण वातावरणात दोघांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली करत आरोपीला जामीन दिल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. 

अश्विनी कोस्टा (२४) हिच्यावर मंगळवारी सकाळी तिच्या गावी जबलपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कोस्टा हिने वाडिया महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ती पुण्यातीलच मल्टीनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत होती. रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर विमानतळ रोडवर पोर्शे कारने अश्विनीसह तिच्या मित्राला उडवले होते. यात अश्विनीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मित्र अनिश अवधिया याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी अश्विनी कोस्टा हिचे पार्थिव तिच्या गावी पोहोचले आणि आज मंगळवारी सकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटूंबीयांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिने घरी येऊन तिचा वाढदिवस साजरा केला होता. घरात सर्वात लहान असल्यानं ती सर्वांची लाडकी होती. अश्विनीच्या भावाने म्हटलं की, आता बहीण या जगात राहिली नाही, पण दोषींवर कठोर कारवाई करावी. अश्विनी आणि अनिश एकाच कंपनीत काम करत होते. दोघेही पार्टीनंतर दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

मृत तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप -

अनिश अवधिया हा उमरिया येथे राहत होता. हातातोंडाशी आलेल्या मुलाचं अपघाती निधन झाल्यानं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अनिशच्या कुटूंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान अनिशचा लहान भाऊ देवेशने पोलिसांवर गंभीर आरोप करताना म्हटले की, येरवडा पोलिसांनी आरोपीबाबत नरमाईची भूमिका घेतली. मृत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचे काय संबंध होते याच्या तपासातच अधिक वेळ घालवला. पोलीस आरोपींची काळजी घेत होते त्याला पिझ्झा-बर्गर देत होते. दुसरीकडे वाढदिवसाच्या पार्टीबद्दल अनिशच्या मित्रांचीच चौकशी करत होते.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर