Pune Porsche Case : पुण्यात कल्याणी नगर येथे १९ मे रोजी रात्री एका बिल्डर पुत्राने आलीशान पोर्शे कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली होती. या घटनेत दोन अभियांता असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सध्या मोठी अपडेट पुढे आली आहे. आरोपी मुलगा सध्या जामीनावर बाहेर आहे. त्याला कोर्टाने ३०० शब्दांत निबंध व आरटीओचा रोड सेफ्टी प्रोग्राम करायला लावला होता. मुलाकडून ३०० शब्दाचा निबंध लिहून घेण्यात आला होता. त्यानंतर आता आरटीओने रोड सेफ्टी प्रोग्राम अंतर्गत वाहन चालवण्याचे प्रशिक्षण आणि वाहतूक नियमांची माहिती दिल्याचे वृत्त आहे. या संदर्भात आरटीओच्या अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात एक भीषण अपघात घडला होता. एका भरधाव अलिशान पोर्शे कारनं दुचाकीवर असलेल्या तरुण-तरुणीला चिरडलं. या अपघातामध्ये या अभियंता असलेल्या तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही कार एक अल्पवयीनं मुलगा चालवत होता. पुण्यातील एका मोठ्या बिल्डरचा हा अल्पवयीन मुलगा होता. अपघात झाल्यावर तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला जमावानं पकडून चोप देऊन त्याला पोलिसांना सुपूर्द केले होते.
पुण्यातील हे पोर्शे प्रकरण संपूर्ण देशात गाजले. आरोपीला नागरिकांनी पकडल्यावर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला ३०० शब्दांत निबंध व १४ दिवस आरटीओ अधिकाऱ्यांसोबत राहून वाहतूक नियमांचे प्रशिक्षण घेण्याची शिक्षा देण्यात आली होती. व त्याला सोडून देण्यात आले होते. यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर मुलाला पुन्हा अटक करून बालसुधार गृहात पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या आई वडिलांनी त्याच्या रक्ताचे नमुने बदलले होते. या प्रकरणी ससुनचे डॉक्टर व कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे. तर मुलाचे वडील आणि आई दोघांना देखील मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल अटक करण्यात आली होती. मुलाच्या आजोबाला देखील अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने देखील आरोपी मुलाला जामीन मंजूर केला आहे.
जामीनावर बाहेर आलेल्या मुलाकडून ३०० शब्दांचा निबंध लिहून घेण्यात आला होता. या प्रकरणी देखील मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. तसेच मुलाने निबंधांत काय लिहिले याची माहिती उघड करण्यात आली नाही. दरम्यान, आता या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे. आरटीओने आरोपी तरुणाला वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. रोड सेफ्टी अंतर्गत हे ट्रेनिंग देण्यात आले आहे. यात वाहतुकीची नियमावली, वाहन चालवताना घ्यायची काळजी, आरटीओकडून कशी कारवाई केली जाते या सारख्या अनेक गोष्टीचे धडे त्याला देण्यात आले आहे.
अल्पवयीन तरुणाला शिक्षा म्हणून ३०० शब्दांचा निबंध लिण्यासोबत तसेच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोबत काम करण्याच्या अटी शर्तीवर जामीन दिला होता. त्यानंतर त्याच्याकडून निबंध लिहून घेण्यात आला होता. त्यावेळी देखील गुप्तता पाळण्यात आली होती. आरटीओने देखील मुलाला प्रशिक्षण देतांना कमालीची गुप्तता पाळली आहे. या बाबत माध्यमांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.