Pune car accident : पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी बिल्डर विशाल अगरवाल याच्यावर शाईफेकीचा प्रयत्न
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune car accident : पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी बिल्डर विशाल अगरवाल याच्यावर शाईफेकीचा प्रयत्न

Pune car accident : पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी बिल्डर विशाल अगरवाल याच्यावर शाईफेकीचा प्रयत्न

May 22, 2024 04:07 PM IST

Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा बाप बिल्डर विशाल अगरवाल याच्यावर आज पुण्यात शाईफेकीचा प्रयत्न झाला.

पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी बिल्डर विशाल अगरवाल याच्यावर शाईफेकीचा प्रयत्न
पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी बिल्डर विशाल अगरवाल याच्यावर शाईफेकीचा प्रयत्न

Pune Car Accident case : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेला बिल्डर विशाल अगरवाल याच्या विरोधात जनसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे. अगरवाल याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून काही लोकांना ताब्यात घेतलं. 

वंदे मातरम् संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी अगरवाल याच्या विरोधात आंदोलन केलं. अगरवाल याला पोलिसांच्या गाडीतून न्यायालयात आणलं जात असताना 'भारत माता की जय', इन्कलाब झिंदाबाद…' अशा घोषणा देत काही कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग केला. गाडीच्या जवळ पोहोचल्यानंतर काही लोकांनी विशाल अगरवाल याच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांना रोखलं आणि ताब्यात घेतलं.

पुण्यातील कार अपघाताची चर्चा सध्या देशभरात आहे. या अपघातातील आरोपी अल्पवयीन आहे. अपघातानंतर काही तासांतच त्याला जामीन मिळाला होता. शिक्षा म्हणून त्याला अपघातावर निबंध लिहिण्याची शिक्षा दिली. या सगळ्या घडामोडींवरून प्रचंड गदारोळ उठला. विरोधकांनी पोलिसांच्या कारभारासह गृहखात्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं होतं.

विशाल अगरवाल याला २४ मेपर्यंत पोलीस कोठडी

हा सगळा गदारोळ सुरू होताच अल्पवयीन आरोपी आणि त्याचा आरोपी वडील विशाल अगरवाल फरार झाला होता. पोलिसांनी राज्यभरात त्याचा शोध सुरू केला होता. अखेर त्याला छत्रपती संभाजीनगर इथून अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणी न्यायालयानं विशाल अगरवाल याला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अगरवाल कुटुंबावर आरोपांची राळ

कार अपघातानंतर अगरवाल कुटुंबावर अनेक आरोप होत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी अल्पवयीन आरोपी मुलावर आरोप केले आहेत. या मुलाच्या त्रासामुळं माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली, असं सोनाली यांनी म्हटलं आहे. तसंच, विशाल अगरवाल याच्या मोठ्या मुलानंही याआधी असाच अपघात केला होता. मात्र ते प्रकरण दाबलं गेल्याची चर्चा आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर