Pune Road Accident Update : पुण्यातील पोर्शे कार अपघातात मोठा खुलासा झाला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी ससुनच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे. या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ते कचऱ्यात फेकून दिले. आरोपी मुलाच्या वडिलांच्या सांगण्यावरून पुराव्यांशी छेडछाड तसेक रक्ताचे नमुने बदलल्याचे तपासात उघड झाले आहे. याआधी या प्रकरणात चालकाला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पुण्यात आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक देऊन दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला हतो. या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटले. यानंतर आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. आरोपीच्या वडीलांना आणि आजोबा यांना देखील अटक करण्यात आली. हा अपघात घडला त्यादिवशी सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, या रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत या बाबत माहिती दिली आहे.
आरोपीच्या रक्ताचे नमुने घेत ते ससुनमध्ये पाठवण्यात आले. मात्र, आरोपीचे रक्ताचे नमुने हे कचऱ्यात फेकून देण्यात आले. रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्या रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले. तर त्याच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या रिपोर्टवर डॉक्टरांनी या अपघाताच्या घटनेतील अल्पवयीन आरोपीचे नाव टाकण्यात आले.
सोमवारीच पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आणि एका डॉक्टरला अटक केली. डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरनोर अशी त्यांची नावे आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत आहे. विशेष बाब म्हणजे सुरुवातीच्या चाचणीत रक्तात दारूचे नमुने आढळून आले नाही, मात्र दुसऱ्या रुग्णालयात जेव्हा दुसरी चाचणी करण्यात आली आणि डीएनएचीही चाचणी केली तेव्हा दोन्ही नमुने वेगवेगळ्या व्यक्तींचे असल्याचे आढळून आले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 'अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेणारे डॉक्टर श्रीहरी हलनीर यांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, फॉरेन्सिक विभागाचे एचओडी डॉ. अजय तावरे यांच्या सूचनेनुसार त्याने रक्ताचे नमुने बदलले होते. डॉक्टरांच्या अटकेनंतर गुन्हेगारी कट रचणे, खोटारडे करणे आणि पुरावे नष्ट करणे आदी आरोपांचाही या प्रकरणात समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही आरोपीचे एक रक्ताचे नमुने औंध येथील सरकारी रुग्णालयात पाठवले होते. त्या रिपोर्टमध्ये आरोपीची रक्ताचे नमुने आणि आरोपीच्या वडिलांच्या रक्ताचे नमुन्याशी मॅच झाली आहेत. मात्र, ससून हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये आरोपीच्या रक्ताचे नमुने हे मॅच झाली नाहीत. त्यामुळे आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही चौकशी केली असता यामध्ये फेरफार आल्याचे आढळून आले. आता या प्रकरणात जे दुसऱ्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते, ते कोणाचे आहेत? याचाही तपास करण्यात येणार आहे”, अशी माहिती पुणे आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.