Pune Porsche accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणी आपल्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी त्याच्या चालकावर दबाव टाकण्यात येत होता. अपघात घडला तेव्हा तो कार चालवत होता. तसेच अल्पवयीन मुलगा मागे बसला होता, असा जबाब दे अशी धमकी मुलाच्या वडिलांनी चालकाला दिली होती. तसेच मुलगा निर्दोष सुटावा यासाठी मुलाच्या आईने देखील चालकाला हात जोडून गुन्हा स्वत:वर घेण्याची विनंती केली होती.
याबाबत माहिती देताना अमितेश कुमार यांनी एका वृत्तपत्राला माहिती देतांना संगितले की, आम्ही चालकाचा जबाब नोंदवला आहे. त्याने नमूद केलं की रविवारी पहाटे २.४५ च्या सुमारास अपघातानंतर मुलाच्या वडिलांनी त्याला फोन करून बोलावले. अपघात झाला तेव्हा तो कारच्या स्टेअरिंगवर होता असं सांगण्यास चालकावर दबाव टाकण्यात आला होता. यावेळी बिल्डरच्या पत्नीनेही भावनिक होऊन त्याला अपघाताची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली होती.
अमितेश कुमार म्हणाले की, अल्पवयीन मुलाचे वडील शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहे. वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेन्द्र अगरवाल यांनी देखील चालक गंगाधर यांच्यावर गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव आणला होता. आम्ही चालकाचा जबाब नोंदवला आहे. रविवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास (अपघातानंतर) बिल्डर विशाल अगरवालने (मुलाचे वडील) चालक गंगाधर याला फोन करून तो गाडी चालवत असल्याचे सांगण्यास सांगितले. यावेळी आरोपी मुलाच्या आईने देखील भावूक होऊन चालक गंगाधर याला अपघाताची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. कुटुंबातील सदस्यांनी त्याला जबाबदारी स्वीकारण्यासाठी वेगवेगळे आमिष देखील दाखवले. मात्र, गंगाधर याने तसे करण्यास नकार दिल्याने त्याला डांबून ठेवण्याचा प्रकार देखील अगरवाल कुटुंबीयांनी केला.
या प्रकरणी पुणे पोलिसांनी वडील विशाल आणि आजोबा सुरेंद्र यांच्यावर घटनेच्या रात्री चालकाचे अपहरण, धमकावणे आणि घटनेच्या रात्री त्याच्या वडगावशेरी येथील निवासस्थानी बंदिस्त करून डांबून ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसानी अगरवाल यांच्या बंगल्यावर छापा टाकला असून बंगल्यातून गंगाधरचे कपडे जप्त करण्यात आले आहेत.
अल्पवयीन मुलाच्या आजोबांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या वकिलांनी सांगितले की, घटनेच्या रात्री सुरेंद्र हे त्यांच्या पत्नीसोबत दिल्लीत होते.
कोर्टात पोलिसांनी आजोबा सुरेन्द्र अगरवाल यांच्या गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचे सांगत त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र अगरवाल याच्यावर फसवणूक, दोन खुनाचा प्रयत्न आणि धमक्या देण्याचे गुन्हे दाखल आहेत.
संबंधित बातम्या