Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील बिल्डर विशाल अगरवाल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. २००७ साली बांधण्यात आलेल्या नॅन्सी ब्रम्हा सोसायटीधारकांची फसवणूक केल्या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे. ब्रम्हा सोसायटीतील ७१ सोसायटी धारकांना पार्किंग, मोकळी जागा देणे कायद्याने बंधनकारक असताना तीन सोसायटी तयार करून एकाच ठिकाणी अँमीनीटी स्पेस व मोकळी जागा दाखवून सोसायटी धारकांची परवानगी नसताना ११ मजली व १० मजली इमारत बांधून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी विशाल अरुण अडसूळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल अरुण अडसूळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल सुरेंद्र कुमार अगरवाल, भाऊ राम कुमार अगरवालबंधू, विनोद कुमार अगरवाल, नंदलाल किमतानी व आशिष किमतानी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ साली बांधण्यात आलेली नॅन्सी ब्रम्हा को.ऑप.हौ.सोसायटीत ७१ जणांनी फ्लॅट घेतले होते. सोसायटीच्या मालकीची जागा आणि पार्किंग, अँमीनीटी स्पेस एकच असून ही जागा वेगवेगळ्या नकाशावर दाखवण्यात आली.
तसेच नाकाशात फेरफार करून ते मंजूर करून नॅन्सी ब्रम्हा सोसायटी सभासदांची परवानगी न घेत बिल्डर विशाल अगरवालने त्याच्या इतर साथीदारांशी संगनमत करून सोसायटीच्या जागेवर ११ मजली इमारतीत तब्बल ६६ कमर्शियल कार्यालये बांधली. तर १० मजली इमारतीत २७ सदनिका व १८ शॉप्स बांधून नॅन्सी ब्रम्हा को.ऑप.हौ. सो.ली सोसायटी धारकांची फसवणूक केली. त्यामुळे हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवर आता पर्यंत कलम २०१ अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल असून या प्रकरणी विशाल अगरवाल हा त्याच्या पत्नीसह पोलिस कोठडीत आहे. त्याने अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला 'तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग' असा दबाव टाकला असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. तर मुलाचे रक्ताचे नमुने देखील बदलण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या सोबतच आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज कलम ४२० अंतर्गत आणखी एक गुन्हा विशाल अग्रवालवर दाखल झाला आहे.