Bopdev Ghat Rape case : पुण्यातील बोपदेव घाटात (Bopdev Ghat) गुरुवारी रात्री ११ वाजता आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत २०० हून अधिक संशयित व्यक्तींची चौकशी केली असून आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे आता आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी ' सिम्बा'ची (SIMBA) मदत पोलिस घेणार आहेत.
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयितांची ओळख पटविण्यासाठी नागपूर येथील एआय संचालित टूल सिस्टीम फॉर इंटेलिजंट मॉनिटरिंग, बिहेवियरल अॅनालिसिस (सिम्बा) द्वारे विविध ठिकाणांहून गोळा केलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बोपदेव घाटात गुरुवारी तरुणीच्या मित्राला झाडाला बांधून तसेच त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांना मारहाण करत आरोपींनई तरुणीवर बलात्कार केला होता. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी व गृह खात्याने आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले आहे. तसेच त्याच्या नावाबाबत देखील गुप्तता पाळली जाणार आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या वेळी घडली होती. तसेच हा परिसर निर्जन असल्याने आम्हाला स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही. तसेच, अंधार असल्याने पीडितेला संशयितांचे चेहरे किती स्पष्ट दिसले या बाबत देखील साशंक आहोत. पीडिटेच्या वर्णणाद्वारे आम्ही स्केचेस तयार केले आहेत. ही सर्व आव्हाने लक्षात घेऊन आम्ही नागपूर पोलिसांकडून प्रगत एआय मॉडेलची मदत घेत आहोत.
जुलै २०२४ मध्ये नागपूर पोलिसांनी पोलिस दलाची क्षमता वाढविण्यासाठी 'सिम्बा' हे एआयवर चालणारे तंत्रज्ञान तयार करण्यात आले. सिम्बा हे एक अत्याधुनिक जेनेरेटिव्ह एआय टूल आहे जे गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, प्रतिमा आणि ऑडिओ यासारख्या विविध स्त्रोतांकडून त्वरित माहिती गोळा करते. हे तंत्रज्ञान तब्बल दीड लाख गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या डिजिटल डेटाबेसशी जोडलेले आहे, ज्यामुळे ते चेहऱ्याची ओळख आणि आवाजाची ओळख यासारख्या वैशिष्ट्यांसह आरोपींचा माग घेतं. या एआय मॉडेलची मदत घेऊन माहिती संकलित केली जाणार आहे. सिंबाचा मुख्य घटक, क्राइम GPT म्हणून ओळखला जातो. तो व्हिडिओ, इमेज आणि ऑडिओमधून माहिती काढण्यासाठी विस्तृत डेटाबेस वापरतो. यात चेहऱ्याची ओळख ओळख, ऑडिओ इनपुट किंवा नैसर्गिक भाषेच्या प्रश्नांचा वापर करून गुन्हेगारी डेटा पोलिस शोधू शकतात.या डेटाबेसमध्ये एलव्हीएम आणि एलएलएम-आधारित एआय मॉडेलद्वारे समर्थित, क्राइम जीपीटीमध्ये स्पीकर आयडेंटिफिकेशन आणि गुन्हेगारी टोळी विश्लेषण यासारख्या आधुनिक वैशिष्ट्य वापरले आहे.
पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले, 'आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहे. या सोबतच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अहमदनगर, सातारा, सांगली या लगतच्या जिल्हा पोलिस दलाचीही मदत घेतली जात आहे. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात येईल असा विशास देखील शर्मा यांनी व्यक्त केला. पोलिसांनी काही संशयितांची ओळख पटवली असून, आणखी पुरावे पोलिस गोळा करत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर पुण्यातील बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी आणि बाणेर टेकडी या सारख्या प्रमुख निर्जन ठिकाणी भविष्यातील घटना टाळण्यासाठी या ठिकाणी सर्चलाईट, लाऊडस्पीकर आणि सायरन बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या