संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असून अनेक नेत्यांचं पक्षांतरही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. अशातच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एका स्कॉर्पिओ गाडीत ५० लाखांची कॅश सापडल्याने खळबळ उडाली आहे. उर्से टोल नाक्यावर ही रोखड जप्त करण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे पुणे व मावळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत ९ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. उर्से टोल नाक्यावर शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी वाहनांची तपासणी करत होते. यावेळी महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीतून ५० लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. त्याबाबत योग्य खुलासा संबंधित व्यक्तीला करता आला नाही. त्यामुळे ही रक्कम पोलिसांनी जप्त केली.
मावळ मतदार संघात अद्याप कोणत्याही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्याआधीच इतक्या मोठ्या प्रमाणात रोखड आढळून आल्याने पोलीस दलही सतर्क झाले आहे.
ही स्कॉर्पिओ पुणे पासिंगची असून कोठे जात होती, याचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जात आहे. निवडणुका तोंडावर इतकी मोठी रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील मावळ तालुक्यात येणाऱ्या उर्से टोल नाक्यावर सापडलेली ही रक्कम नेमकी कोणत्या कारणास्तव गाडीमध्ये ठेवली होती.
या पैशांचा आगामी निवडणुकांसोबत काही संबंध आहे का? या पैशांची वाहतूक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केली जात होती का? तसे असेल तरी कोणत्या पक्षाची ही रोकड आहो? यामागे अन्य कोणतं कारण आहे का? याची चौकशी केली जात आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही रोकड आयकर विभागाकडे जमा केली असून निवडणूक आयोगाला याबाबत कळविण्यात आलेलं आहे.
संबंधित बातम्या