विधानसभेचा प्रचार सुरू होण्याआधीच पुण्यात पाच कोटींची रोकड जप्त, कारमधील ते पैसे कुणाचे?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विधानसभेचा प्रचार सुरू होण्याआधीच पुण्यात पाच कोटींची रोकड जप्त, कारमधील ते पैसे कुणाचे?

विधानसभेचा प्रचार सुरू होण्याआधीच पुण्यात पाच कोटींची रोकड जप्त, कारमधील ते पैसे कुणाचे?

Oct 21, 2024 10:29 PM IST

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असतानाच येथील खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.

खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटींची रोकड जप्त ( File Pic)
खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटींची रोकड जप्त ( File Pic)

निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा करताच राज्यातील घडामोडी वेगवान झाल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून महाविकास आघाडी व महायुतीमधील अन्य घटक पक्षांच्या  उमेदवार याद्या पुढील काही तासात जाहीर होण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असून त्या आधीच पुण्यात मोठं घबाड सापडलं आहे. एका कारमधून पोलिसांनी ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना येथील खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. खासगी वाहनातून अंदाजे पाच कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. ही गाडी पुण्यातून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता नियमानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा  निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील भोरच्या जवळ राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गाडीत ही रोकड आढळून आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही गाडी पुण्यातून कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत होती. एका खासगी गाडीतून मोठी रक्कम नेली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार खेड शिवापूर टोलनाक्याजवळ पोलिसांनी गाडी पकडली आणि मोठ्या शिताफीने गाडीतील रक्कम जप्त केली.

संबंधित खासगी कार पोलिसांनी ताब्यात घेतलेली असून अंदाजे चार ते पाच कोटी रक्कम असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. जप्त केलेली रक्कम मोजण्याचे काम चौकीत सुरू आहे. यासंबंधी पुढील तपास पुणे पोलीस करीत आहेत.

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ७७६

राज्यात विधानसभा निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ७७६ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ७७३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३१ कोटी १६  लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर