Pune drugs racket busted : ललित पाटील पाटील प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आणखी मोठी कारवाई करत तब्बल कुरकुंभ येथील कारखाण्यातुन १४०० कोटींचे तब्बल ७०० किलो ड्रग्ज जप्त केले. पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी राज्यसह देशभर छापेमारी केली. यात सकाळी झालेल्या कारवाई नंतर दिल्ली येथे देखील एका कारवाईत तब्बल ८०० कोटी रुपये किमतीचे ४०० किलो एमडी जप्त केले. पुणे पोलिसांनी तीन दिवसात तब्बल २ हजार २०० कोटी पेक्षा जास्त मेफेड्रॉन छापा टाकून जप्त केले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सॅम आणि ब्राऊ नावाच्या तस्करांच्या शोधासाठी काही पथके दिल्ली तर काही पथके मुंबईत रवाना करण्यात आली आहेत.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली आहे. अमितेश कुमार म्हणाले, गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई करत सुरुवातीला चार कोटींचे ड्रग जप्त केले होते. त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करत, विश्रांतवाडी येथे दोन गोदामांवर छापा टाकला. यामध्ये मिठाच्या गोदामात लपवून ठेवलेले ५५ किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. हाच धागा पकडत तपास पथकांनी युद्ध पातळीवर तपास करत, कुरकुंभ एमायडीसी मधील एमडी ड्रग बनवणाऱ्या कंपनीवर छापा टाकला आहे.
मेफेड्रॉनचे उत्पादन सुरू असलेली कंपनी नगर जिल्ह्यातील अनिल साबळे व्यक्तीने अर्थ केम प्रायव्हेट लिमिटेड नावाने सुरु केली . याप्रकरणी साबळेला ताब्यात घेण्यात आले आहे. याच बरोबर मेफेड्रॉन बनविण्याचा फार्मुला देणाऱ्या केमिकल इंजिनियरला डोंबिवली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कटाचा सहभाग असून विविध परदेशी व्यक्तींचा देखील यामध्ये सहभाग निष्पन्न होत असल्याने त्या दृष्टीने तपास पथके कामाला लागली आहेत. या प्रकरणात राज्यासह देशभरात विविध शहरांमध्ये पुणे पोलीस छापे घालत आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.साबळेची ही कंपनी ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होती. या व्यवसायामागील मुख्य ब्रेन एक परदेशी नागरिक असल्याचे पुढे आले आहे. त्याचा युध्दपातळीवर शोध सुरु करण्यात आला आहे. दरम्यान हे अंमली पदार्थ मुंबईमार्गे इतर राज्यातही पाठवण्यात येत असल्याचे उघड झाले.
पुणे पोलिसांची एक टिम हैदरच्या विश्रांतवाडी येथील गोडाऊनची झाडाजडती घेत होती. यावेळी तीन लहान ट्रक येथे मालाची डिलिव्हरी देण्यासाठी आले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते ट्रक मध्ये कुठला माल घेऊन आले होते. याची त्यांना माहिती नव्हती. यावेळी पोलिसांनी तुम्ही हे माल कुठून आणला याची माहिती विचारली असता त्यांनी कुरकुंभ येथील कंपनीची माहिती दिली. या तीनही ट्रक चालकांना घेऊन पुणे पोलीस रात्रीच कुरकुंभ येथे घेऊन गेले आणि फॅक्टरीचा भांडाफोड झाला.
अंमली पदार्थांचा तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असेल ते रोखण्यासाठी पुणे पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहे. या प्रकरणात आणखी अमली पदार्थ मिळून येण्याची शक्यता असून इतर ठिकाणी आरोपींनी कारखाने सुरू केले आहेत का यात देखील चौकशी करण्यात येत आहे. कुरकुंभ येथून देशातील ५ मोठ्या शहरात मेफेड्रोन पाठवण्यात येत होते. यात कल्याण, भिवंडी, पुणे, हैदराबाद आणि बंगलोरचा समावेश आहे.
जप्त करण्यात आलेले ड्रग्ज भविष्यात कोणत्याही न्यायालयीन प्रक्रीयेत अडकू नये पुणे पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. म्हणून हे जप्त करण्यात आलेले मेफेड्रॉन फॉरेन्सीक लॅबला ( एफएसएल ) पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.