एलआयसी एजंट असल्याचं सांगून देशभरातील अनेकांना लुटलं; पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; १५० सिमकार्डसह तिघांना अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एलआयसी एजंट असल्याचं सांगून देशभरातील अनेकांना लुटलं; पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; १५० सिमकार्डसह तिघांना अटक

एलआयसी एजंट असल्याचं सांगून देशभरातील अनेकांना लुटलं; पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; १५० सिमकार्डसह तिघांना अटक

Feb 03, 2025 09:14 AM IST

Pune fake insurance call centre racket : एलआयसीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी 'फ्रॉड कॉल सेंटर'वर छापे टाकत मोठी कारवाई केली आहे.

एलआयसी एजंट सांगून देशभरातील नागरिकांना लुटणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पुण्यात पर्दाफाश; १५० सिमकार्डसह तिघांना अटक
एलआयसी एजंट सांगून देशभरातील नागरिकांना लुटणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पुण्यात पर्दाफाश; १५० सिमकार्डसह तिघांना अटक

Pune fake insurance call centre racket : पुण्यातील वाकडेवाडी येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा शिवाजी नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आयुर्विमा पाॅलिसीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांची फसवणूक या कॉल सेंटरमधून केली जात होती. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी  आरोपींकडून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातून आणखी मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी शंकर कारकून पोखरकर (वय ४२, रा. कात्रज), मेहफूज मेहबुब सिद्दीकी (वय ४०, रा. औंध), अशिष रामदास मानकर (वय ४८, वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. आरोपी पोखरकर हा या कॉल सेंटरचा मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून नामांकित ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के, १५ मोबाइल संच, १५० सिम कार्ड आणि वेगवेगळ्या ३० बँकांचे चेक बूक जप्त केले आहे.  आरोपींनी दोघांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एलआयसी एजंट असल्याची बतावणी करून आरोपीने २०२१ मध्ये शिवाजीनगर भागातील एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी वास्तव्याची ठिकाणे बदलत होते. तांत्रिक तपासावरून शिवाजीनगर सायबर पथकातील पोलीस कर्मचारी आदेश चलवादी, तेजस चोपडे यांनी बनावट कॉल सेंटरचा शोध घेतला. त्यानंतर वाकडेवाडी येथे फ्यूचर ग्लोबल सर्व्हिस नावाने सुरू असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला.  शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत म्हणाले, 'आरोपी पूर्वी विमा कंपनीशी संबंधित होता. त्याने अनेकांची फसवणूक केली असावी, अशी शक्यता आहे. त्याने एलआयसीचा ग्राहकांचा माहिती मिळविली. त्यानंतर या माहितीचा गैरवापर करुन आरोपींनी नागरिकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली व त्यांची फसवणूक करण्यास सुरुवात केली होती. 

पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, पोलीस कर्मचारी नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख, सरस्वती कांगणे यांनी ही कामगिरी केली. 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर