पुणे : पुण्यातील तरुणाई ही नशेच्या विळख्यात सापडत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ड्रग्स तस्करांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि अमली पदार्थ जप्त केले गेले आहेत. मंगळवारी (दि २६) एका नायजेरियन जोडप्याकडून तब्बल १ कोटी ३१ लाख रुपयांचे कोकेन, मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहेत.
उगूचुकू इम्यानुअल ( वय ४३, रा. नालंदा गार्डन रेसिडेन्सी, मुळ नायजेरिया). एनिबेल ओमामा व्हीव्हान (वय ३०, नालंदा गार्डन रेसिडेन्सी, मुळ नायजेरिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या एका पोलिस अमंलदाराला एका बातमीदारामार्फत बाणेर येथे एक नायजेरियन जोडपे नालंदा गार्डन रेसीडन्सीमध्ये अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही बाब त्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जाणकर यांना कळवले.
त्यांनी घटनास्थळी जात सापळा रचला. तसेच बनावट ग्राहक पाठवून या जोडप्याकडे अमली पदार्थाची मागणी केली. यावेळी दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून ९६ लाख ६० हजार रुपयांचे ६४४ ग्रॅम मॅफेड्रॉन तर २०१ ग्रॅम आणि १२० मिलीग्रॅम कोकेन आणि किरू असे ३० लाख १६ हजार ८०० रुपये तर रोख २ लाख १६ हजार ६००, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या आणि डब्या असा एकुण १ कोटी ३१ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.