Pune Crime news : पुण्यातील पोलिस यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतली होती. याचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करून शहरातून तडीपार केलेल्या 'चूहा गँग'मधील आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलिसांना आरोपींची टीप मिळाली होती. यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, मॅफेड्रॉन (एमडी, हा अमली पदार्थ, कोयता, व डिजिटल वजन काटा जप्त करण्यात आला आहे.
तौसिफ जमीर सय्यद उर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. करमाळा), मार्कस डेविड इसार दिवशी सुनावणी (वय २९, रा. धानोरी), कुणाल रमेश नाधव (वय २५, रा. वडगाव शेरी) तसेच आणखी एकाला अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी तक्रार दिली आहे.
या घटनेची माहिती अशी की, तौसिफ सय्यद याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला पुण्यातून मकोका विशेष न्यायालयाने दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. दंगल घडविणे, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे त्याच्यावर आहेत. पोलिसांनी त्याला २०२० मध्ये 'एमपीडीए' कायद्यांतर्गत स्थानबद्ध देखील केले होते. मात्र, त्याने त्याचे उद्योग सुरूच ठेवले होते.
तौसिफ सय्यद व त्याच्या चुहा गँगचे काही जण पुण्यात मोठ्या दरोड्याच्या तयारीत असल्याची टीप आंबेगाव पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपी हे घटनास्थळी येताच त्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून अनेक घातक शस्त्र देखल जप्त करण्यात आले आहेत. मात्र, या कारवाईत एक जण फरार झाला आहे. पोलिस त्याच्यामागावर असून त्याला देखील अटक केली जाईल अशी माहिती आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी दिली. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली.