Pune PMC News : पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जुन्या काही प्रकरणावरून निलंबन केले होते. त्यांचे हे निलंबन चुकीचे असल्याचे डॉ. भगवान पवार यांचे म्हणणे असून त्यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची कामं करण्यास सांगितली. इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला, असा गंभीर आरोप डॉ. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यांच्या या पत्रामुळे खळबळ उडाली असून या पत्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार या कडे लक्ष लागले आहे. तसेच पवार यांच्या लेटर बॉम्बमुळे पालिकेत देखील चर्चांना उधाण आले आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य अधिकारी आणि सध्याचे पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ प्रकरण व आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत त्यांचे राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने निलंबन केले होते. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली आल्याची चर्चा आहे. सध्या त्यांची बदली ही नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात अलायी आहे. या कारवाई नंतर भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अनेक गंभीर आरोप आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर केले आहे. दरम्यान, या पूर्वी देखील भगवान पवार यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाचा पदभार हाती घेतल्यावर डॉ. भगवान पवार यांची साडेतीन महिन्यात बदली करण्यात आली होती. या बदली विरोधात भगवान पवार हे मॅटमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा पालिकेत रुजू करण्यात आले होते.
भगवान पवार यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी पुणे महानगर पालिकेत वर्षभरापासून कार्यरत आहे. या ठिकाणी माझ्या कामाबाबत कोणत्याही गंभीर तक्रारी नाहीत. तर कोणतही चौकशी देखील झाली नाही. महानगरपालिकेकडून कोणतेही चुकीचे शेरे देखील देण्यात आलेले नाही. तरीसुद्धा माझ्यावर निलंबनाची चुकीची कारवाई करण्यात आली आहे. एक मागासवर्गीय अधिकारी असल्याने अनाई जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली आहे. मंत्री महोदय मला त्यांच्या कात्रजमधील ऑफिसला बोलावून नियमबाह्य टेंडर काढण्यासाठी दबाव टाकत होते. मी हे नियमबाह्य कामे करण्यास नकार दिल्याने. त्यांचा रोष माझ्यावर आहे. या रोषापोटी आणि आकसापोटी माझ्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पुणे आरोग्य अधिकारी प्रमुख पद रिक्त करण्यासाठी माझी हा पदभार घेतल्यावर काही दिवसांत बदली करण्यात आली. मात्र, मी मॅटमध्ये जाऊन या बादलीला आव्हान दिले. माझ्या विरोधात काही करता येत नअसल्याने माझ्या विरुद्ध खोट्या तक्रारीसंदर्भात चौकशी समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या समितीने माझी चौकशी न करताच अहवाल सादर करून मला निलंबित केले. माझ्यावर अन्याय झाला आहे. माझे निलंबन मागे घ्यावे अशी विनंती पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
डॉ. भगवान पवार हे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी असतांना त्यांच्याविरुद्ध कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी तसेच अनियमित कामकाज, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, मानसिक व आर्थिक त्रास देणे, आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी आरोग्य सेवा आयुक्तालयाने भगवान पवार यांच्या विरोधात २९ एप्रिल रोजी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. तक्रारीचे स्वरूप गंभीर असल्याने त्यांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी निलंबन गरजेचे आहे, अशी शिफारस समितीने केली. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली व निलंबन करण्यात आले.
संबंधित बातम्या