Pune Pimpri-Chinchwad Crime : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. आता अल्पवयीन मुले देखील गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळली आहे. अशीच एक घटना पिंपरी- चिंचवडमध्ये एका शाळेच्या आवारात घडली असून किरकोळ कारणावरून नवीतील मुलाने दहावीत शिकणाऱ्या मुलाला चाकूने भोसकले. यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून शिक्षणाच्या मंदिरात अल्पवयीन मुले कोयते आणि चाकू घेऊन गुंडगिरी करत असल्याने त्यांच्या भविष्याची चिंता वाढली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरकोळ कारणावरून सहा अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करत चाकूने भोसकले. गुरुवारी पिंपरीतील एका बड्या शाळेत फिर्यादी अल्पवयीन मुलाची इतर अल्पवयीन मुलांनी स्कुल बॅग ओढली. दरम्यान, ती फाटल्याने दोघांमध्ये भांडण झाले. दरम्यान, शाळेत दहावीच्या परीक्षेची पूर्वतयारी सुरू असल्याने दोघेही आपल्या वर्गात गेले.
मात्र, या भांडणाचा राग मुलांच्या मनात होता. त्यामुळे सहा अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने फिर्यादी अल्पवयीन मुलाला दुसऱ्या दिवशी शाळेत गाठले. त्यांनी तक्रारदार मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एकाने बॅगेत आलेला चाकू काढून फिर्यादीमुलाच्या पोटात भोसकला. यात मुलगा गंभीर जखमी झाला. तयाला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. यामुळे त्याचे प्राण वाचले. या घटनेनंतर तक्रारदार मुलाच्या पालकाने पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्व मुले अल्पवयीन असल्याने त्यांना मुलांना समजपत्र दिले आहे. पिंपरी पोलिसांत अल्पवयीन मुलांविरोधात खुनाचा प्रयत्न हे कलम लावले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यात कोयते हल्ले, रस्त्यांवर हल्ले आणि मारहाण, दहशतीचे प्रकार सर्रास घडत आहे. या शहरातील गुन्हेगारीचा परिणाम शाळकरी मुलांवर दिसून येत आहे. त्यामुळे आता ही गुन्हेगारी वृत्ती थेट शाळेच्या आवारात दिसून येत आहे.