Pune Ola Uber News : पुणेकरांच्या खिशाला आता झळ बसणार आहे. पुण्यात ओला उबेरचा गारेगार प्रवास आता महागणार आहे. एसी कारच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बुधवारी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता पुण्यात एसी कारमधून प्रवास करण्यासाठी पहिल्या दीड किलोमीटर साठी ३७ रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रूपये पुणेकरांना मोजावे लागणार आहेत. दरम्यान, काळी पिवळी टॅक्सीच्या दरांमधे कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. हे दर पूर्वीप्रमाणेच पहिल्या दीड किलोमीटर साठी ३१ रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटर साठी २१ रुपये याप्रमाणे राहणार असल्याहे प्राधिकाराने स्पष्ट केले आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रात काळी पिवळी टॅक्सी व वातानूकुलीत टॅक्सीच्या (कुलकॅब) भाडे दरात १ जानेवारीपासून सुधारणा करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील कार्यक्षेत्रात भाडेसुधारण्याच्या अनुषंगाने खटुआ समितीच्या शिफारशीनुसार तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत भाडे दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काळी पिवळी टॅक्सीला पहिल्या १.५ कि.मी. करिता ३१ रूपये, त्यापुढील प्रत्येक १ कि.मी. करिता २१ रूपये तर वातानूकुलीत टॅक्सीला (कुलकॅब) पहिल्या १.५ कि.मी. करिता ३७ रूपये व त्यापुढील प्रत्येक १ कि.मी. करिता २५ रूपये असा भाडेदर निश्चित करण्यात आला असल्याचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी कळविले आहे.
संबंधित बातम्या