मराठा आरक्षणासाठी रविवारी (११ ऑगस्ट) अखंड मराठा समाजाकडून शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
रविवारी सारसबाग येथून मराठा आरक्षण शांतता रॅली निघणार आहे. तेथून बाजीराव रोड, आप्पा बळवंत चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एस.एस.पी.एम.एस. मार्गे जंगली महाराज रोडने गरवारे पुल छत्रपती संभाजी पुतळा येथे विसर्जन होणार आहे.
रॅलीमुळे जेधे चौक परिसर, सोलापुर रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, जे. एम रोड, कर्वे रोड, तसेच खंडोजी बाबा चौक या परिसरा मधील वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने आवश्यकते नुसार वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.